वृत्तसंस्था /नवी दिल्ली
एससीईआरटी (राष्ट्रीय शिक्षण आणि संशोधन प्रशिक्षण महामंडळ) च्या 10 वीच्या पुस्तकातून केमिस्ट्रीतील पिरिऑडिक टेबल (आवर्तन सारणी) हा धडा वगळण्यात आला आहे. त्याचप्रमाणे लोकशाही हा धडाही काढण्यात आला आहे. विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचे ओझे कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे महामंडळाकडून गुरुवारी एका वक्तव्याद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. जीव उत्क्रांती सिद्धांताचा धडाही वगळण्यात आला. हे धडे वगळण्याला शिक्षण तज्ञांनी विरोध केला होता. तथापि, कोरोनाच्या उद्रेकामुळे शाळांचे वेळापत्रक अस्ताव्यस्त झाले होते. परिणामीं, अभ्यास क्रम कमी करण्यासाठी काही धडे वगळणे आवश्यक होते. त्यामुळे आक्षेपांना नाकारत हे धडे काढण्यात आले. विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे अधिक दडपण न टाकण्याचे धोरणही प्रभावीपणे लागू करण्यासाठी हे निर्णय घेण्यात आल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे.
तरीही विद्यार्थी शिकू शकतात…
जे विद्यार्थी हे वगळलेले विषय किंवा धडे 11 वी आणि 12 वीला विषय म्हणून घेणार असतील तर त्यांना ते शिकविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. उदाहरणार्थ जे विद्यार्थी 11 वी आणि 12 वी ला केमिस्ट्री (रसायनशास्त्र) हा विषय घेणार असतील तर त्यांना पिरिऑडिक टेबल हा विषय 10 वीमध्येही शिकविण्यात येणार आहे, असे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. उत्क्रांतीसंबंधींचा धडा वगळण्याचा निर्णय या वर्षीच्या प्रारंभी घेण्यात आला होता. त्यावेळी 1,800 विद्यार्थी आणि काही शिक्षकांनी जोरदार आक्षेप घेतला होता. तथापि, 12 वी ला उत्क्रांतीवाद शिकविला जातो. शिवाय याची सविस्तर माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे, असे स्पष्ट करत, महामंडळाने आक्षेप नाकारले होते.