अॅड. एन. आर. लातूर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : कर्नाटक राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगासाठी इमारत उपलब्ध करून देणे व अतिरिक्त ग्राहक आयोगाच्या पीठाची कायमस्वरुपी बेळगावात स्थापना करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन बेळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष अॅड. एन. आर. लातूर यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना दिले. कर्नाटक राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या पीठासाठी बेळगाव येथील जिल्हा न्यायालयाशेजारी असणाऱ्या जिल्हा ग्राहक न्यायालयाची इमारत देण्याची सूचना करण्यात आली आहे. ग्राहक न्यायालयामध्ये अधिक प्रमाणात ज्येष्ठ नागरिक तक्रारी दाखल करतात. सदर पीठ जिल्हा न्यायालयाच्या शेजारीच ठेवण्यात यावे. कारण ज्येष्ठ नागरिकांना व वकिलांना सोयीचे होणार आहे. सदर पीठ दुसरीकडे स्थापन केल्यास वकिलांसह ज्येष्ठ नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागणार आहे. बेळगाव येथे कार्यरत असणाऱ्या अतिरिक्त ग्राहक आयोगाच्या न्यायालयासाठी स्वतंत्र कक्ष, कर्मचाऱ्यांची कमतरता, मूलभूत सुविधांचा अभाव आहे. याचे निवारण करण्यात यावे. कर्नाटक राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कायम संचारी पिठाला उपरोक्त इमारत उपलब्ध करून देण्यात यावी, अतिरिक्त ग्राहक आयोग कायम करण्यात यावे, त्या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी अॅड. साईदीप पुजार, अनिल शिन्नोळकर यांच्यासह इतर वकील उपस्थित होते.