महामेळावा : म. ए. समिती नेते, कार्यकर्त्यांची धरपकड, सायंकाळी सुटका
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक सरकारच्या विधीमंडळ अधिवेशनाला विरोध म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सोमवारी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतु पोलिसांनी जमावबंदीचा आदेश काढत परवानगी नाकारली. यामुळे म. ए. समितीच्या नेते व कार्यकर्त्यांना पोलिसांनी दडपशाही करत अटक केले. सीमाभागात प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. गावोगावी निषेध सभा घेऊन कर्नाटक सरकारचा व पोलिसांचा निषेध करण्यात आला. याचे पडसाद बेळगावसह महाराष्ट्रातही उमटले.
व्हॅक्सिन डेपो परिसराला 144 कलम लावण्यात आल्याने सोमवारी सकाळपासूनच जमावबंदी करण्यात आली. शेकडो पोलीस या परिसरात तैनात करण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी सकाळी घातलेला मंडपही पोलिसांकडून काढण्यासाठी दडपशाही करण्यात आली. कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर अटकसत्र सुरू करण्यात आले. दिवसभरात समिती नेत्यांसाठी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यांना शहरातील विविध पोलीस स्थानकात दिवसभर स्थानबद्ध करून सायंकाळी सुटका करण्यात आली.
कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषिकांकडून महामेळावा आयोजित केला जातो. यासाठी मागील 15 दिवसांपासून शहरासह बेळगाव, तालुका व खानापूरमध्येही जागृती करण्यात येत होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मध्यस्थीनंतर सीमावासीयांची आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु सोमवारी पोलीसांनी पुन्हा एकदा भाषिक अधिकारांची पायमल्ली करत दडपशाही अवलंबली. या घटनेचा सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेत्यांना घरीच केले स्थानबद्ध
मागीलवर्षी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई हल्ला करण्यात आला. यामुळे बेळगाव बंदसह दोन्ही राज्यांमधील वातावरण तापले होते. हे कारण देत यावर्षी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना घरीच स्थानबद्ध करत त्यांना घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांच्यासह इतर नेत्यांना पोलिसांनी घराबाहेर पडण्यास मानई केली. पोलिसांच्या या दडपशाही विरोधात समिती नेत्यांनी संताप व्यक्त केला.
व्हॅक्सिन डेपोला पोलीस छावणीचे स्वरूप
रविवारी सायंकाळपासून व्हॅक्सिन डेपो परिसरात पोलिसांची वाहने दाखल झाली होती. सोमवारी सकाळी व्हॅक्सिन डेपोकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड लावून बंद करण्यात आले होते. तसेच इतर मार्गांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंडोळीरोड, लेलेग्राऊंड रोड, आगरकर रोड या परिसरातील नागरिकांनाही पोलिसांच्या या दडपशाहीचा फटका बसला.
पोलीस महासंचालकांकडून पाहणी
कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालकांनी सोमवारी सकाळी व्हॅक्सिन डेपो येथील मेळाव्याच्या ठिकाणाला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले व्हॅक्सिन डेपो परिसरात 144 कलम लागू करण्यात आल्याने महामेळाव्याला परवानगी देण्यात आली नाही. म. ए. समितीने टिळकवाडी पोलीस स्थानकात महामेळाव्याच्या मंजुरीसाठी अर्ज दिला होता. परंतु जमावबंदीचा आदेश असल्याने परवानगी दिली नाही. तसेच इतर कोणत्याही ठिकाणी महामेळावा घेण्याचा प्रयत्न झाल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील असे त्यांनी सांगीतले.
सायंकाळनंतर केली सुटका
व्हॅक्सिनडेपो येथून ताब्यात घेतलेल्या म. ए. समितीचे नेते व कार्यकर्त्यांना माळमारूती, एपीएमसी व महिला पोलीस स्थानकात स्थानबद्ध करण्यात आले. दिवसभर पोलीस स्थानकात ठेवल्यानंतर सायंकाळी 5 नंतर सर्वांची सुटका करण्यात आली. परंतु कर्नाटक सरकारने चालविलेल्या या दडपशाहीचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
खानापूर तालुका म. ए. समितीकडून निषेध
व्हॅक्सिनडेपो येथे होणाऱ्या महामेळाव्यासाठी खानापूर तालुका म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी गावो गावी जावून जागृती केली होती. त्यामुळे सोमवारी सकाळी शेकडो कार्यकर्ते बेळगावमध्ये दाखल झाले. परंतु पोलीसांकडून व्हॅक्सिनडेपो परिसरात जाऊ दिले नसल्याने त्यांनी मराठा कॉलनी परिसरात आपला निषेध नोंदविल. यावेळी खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी सभापती सुरेश देसाई, संभाजी देसाई, पी. एच. पाटील, जगन्नाथ बिर्जे, दत्तू कुट्रे, युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, किरण पाटील, विनायक सावंत, किशोर हेब्बाळकर, निरंजन सरदेसाई, रणजित पाटील, बळीराम पाटील, रवी पाटील, राजू पाटील, सुनिल पाटील, पुंडलिक पाटील, नागेंद्र जाधव, राजाराम देसाई, पुंडलिक कुलम, सहदेव बावडेकर यासह इतर कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.