वृत्तसंस्था/ ब्युनोस आयरिस (अर्जेंटिना)
कतारमध्ये 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान होणाऱया फिफाच्या पुरुषांच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी 26 जणांचा अर्जेंटिनाचा संघ घोषित करण्यात आला असून लायोनेल मेसीकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या संघामध्ये अर्जेंटिनाचा आघाडी फळीत खेळणारा पाओला डिबेलाला जखमी स्थितीनंतर संघात निवडण्यात आले आहे.
पाओला डायबोला हा एसी रोमा क्लबकडून आघाडीफळीत खेळत होता पण गेल्या ऑक्टोबरपासून दुखापतीमुळे त्याला फुटबॉल क्षेत्रापासून अलिप्त रहावे लागले. अशा स्थितीत या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी अर्जेंटिनाचे प्रमुख प्रशिक्षक लायोनेल स्केलोनी यांनी डिबेलाला संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. कतारमध्ये होणाऱया फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाचा सलामीचा सामना 22 नोव्हेंबरला सौदी अरेबियाशी होणार आहे. या सामन्यापूर्वी डिबेला पुर्ण तंदुरुस्त होईल अशी आशा अर्जेंटिनाच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केली आहे.
विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिना क गटात असून या गटामध्ये सौदी अरेबिया, मेक्सिको आणि पोलंड यांचा समावेश आहे. अर्जेंटिनाचे सामने मेक्सिको आणि पोलंडबरोबरही होणार आहेत. 2021 साली अर्जेंटिनाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा जिंकली होती.
अर्जेंटिना संघ- गोलरक्षक- इमिलानो मार्टिनेज, प्रँको अर्मानी, गिरोनिमो रुली, बचावफळी-गोंझालो माँटेल, नेहुल मोलिना, जर्मन पिझेला, क्रिस्टियान रोमेरो, निकोलास ओटामेंडी, लिसांद्रो मार्टिनेज, जुआन फोयथ, निकोलास टॅगिलाफिको, मार्कोस ऍक्युना, मध्यफळी- लेनार्दो पॅरेडेस, गुडिओ रॉड्रीग्स, इंझो फर्नांडिस, रॉड्रिगो डी पॉल, एक्सक्वेल पॅलासिओस, ऍलेसॅड्रो गोमेज, ऍलिक्स मॅकऍलेस्टर, आघाडीफळी- पाओला डिबेला, लायोनेल मेसी, अँजेल डी मारिया, निकोलास गोन्जालेज, जोआक्विन कोरिया, लॉरेटो मार्टिनेज आणि ज्युलियन अल्वारेज.