‘तुझाही दाभोळकर होणार आहे’ अशी धमकी देणारा सौरभ पिंपळकरच्या शोधासाठी महाराष्ट्र पोलीसांची यंत्रणा कामाला लागली आहे. आपल्या सोशल मीडीया अकाउंटवर स्वताला भाजप कार्यकर्ता म्हणवणाऱ्या सौरभने आपण धर्मनिरपेक्षता वादाचा तिरस्कार करत असल्याचेही लिहीले आहे. त्याच बरोबर सौरभचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबरही फोटो असून त्यामध्ये सौरभ पिंपळकरचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब यांचाही समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सौरभ पिंपळकर यांच्याकडून ट्विटरवर ठार मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेससह शिवसेना आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी या गोष्टीवर तिव्र नाराजी व्यक्त केली. या संदर्भात त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर टिका करून निषेध केला आहे. राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे य़ांनी या धमकीच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्र पोलीसांना दिले आहेत.
सौरभ पिंपळकराच्या बाबतीत एक महत्वाची बातमी समोर येत असून तो अमरावती शहरातील साईनगर भागात राहतो. तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचे त्याने आपल्या सोशल मीडीयाच्या प्रोफाईलवर लिहीले आहे. तसेच मी धर्मनिरपेक्ष या तत्वाचा तिरस्कार करतो असेही त्याने म्हटले आहे. त्याच्या टि्वटर अकाउंट च्या प्रोफाईलवर त्याने ‘आय ॲम बीजेपी ॲक्टिव्हिस्ट….आय हेट सेक्यूलेरिझम’ असे नमूद केले आहे. काही दिवसापुर्वी झालेल्या शासकीय विदर्भ ज्ञान- विज्ञान संस्थेतील पेपर फुटीच्या प्रकरणात भाजपाचा माजी नगरसेवक प्रणीत सोनी याच्यासह सौरभ पिंपळकर हा सुद्धा आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे.
सौरभ पिंपळकरचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबतची छाय़ाचित्रे त्याच्या सोशल मीडीया अकाउंटवर दिसत आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्याबरोबरची सौरभची हे फोटो सोशल मीडीयावर व्हायरल होत आहेत.
अमरावती पोलीसांचे पथक त्याच्या मागावर असून त्याच्या घरीही जाऊन आले, पण त्याने पोलीसांना चकवा दिला असून त्याचा मोबाईलही बंद असल्याचे अमरावती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले आहे.