वृत्तसंस्था/ प्रयागराज
उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये शुक्रवारी नमाजानंतर झालेली हिंसा आणि दगडफेक प्रकरणी पोलिसांची कारवाई सुरूच आहे. प्रयागराज हिंसेतील 59 आरोपींची सीसीटीव्ही फुटेजद्वारे ओळख पटविण्यात आली आहे. प्रयागराज अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी या आरोपींच्या अटकेसाठी त्यांची छायाचित्रे सोशल मीडियाच्या मदतीने प्रसारित केली आहेत. आरोपींनी आत्मसमर्पण न केल्यास त्यांच्या विरोधात न्यायालयाची अनुमती घेत जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 95 जणांना अटक केली आहे.
दगडफेकीच्या घटनेत सामील 37 लोकांच्या नावाची यादी प्रयागराज विकास प्राधिकरणाला मिळाली आहे. प्राधिकरण आता या आरोपींच्या वास्तव्याचे ठिकाण शोधत आहे. हिंसेनंतर बहुतांश आरोपींनी घराला टाळे ठोकून अन्यत्र धाव घेतली आहे. यामुळे आरोपींबद्दल चौकशी करण्यास अडथळे येत असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले.