शहरात तीन ठिकाणी विशेष बस : महिलांना सुरक्षितता मिळणे आवश्यक : प्रतिसाद मिळणार का पाहावे लागणार
बेळगाव : महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरात सुरू करण्यात आलेल्या पिंक बसना प्रवाशांच्या प्रतिसाद मिळणार का? याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. शहरात तीन ठिकाणी या विशेष बस धावत आहेत. मात्र या बसना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे परिवहनच्या पिंक बस प्रवाशांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. महिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी परिवहनने 26 जानेवारीपासून शहरात तीन बस सोडल्या आहेत. यापूर्वी महिलांसाठी विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. मात्र तेव्हादेखील महिला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. प्रवासादरम्यान महिलांची छेडछाड करणे आणि इतर प्रकार वाढले आहेत. त्यामुळे विविध संघटनांकडून महिलांसाठी विशेष बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत होती. या मागणीनुसार चार दिवसांपासून शहरात तीन बस धावत आहेत. मात्र, या बसना महिला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळेनासा झाला आहे.
सार्वजनिक बसमध्ये महिलांसाठी 50 टक्के राखीव सीट असल्या तरी सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळेस महिलांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिलांची गर्दी असलेल्या मार्गांवर विशेष बस सुरू करावी, अशी मागणी महिला आणि विविध संघटनांकडून होत होती. याला प्रतिसाद देत परिवहनने विशेष बस सुरू केली आहे. विशेषत: या बसमध्ये वाहक (कंडक्टर) ही महिलाच आहे. मध्यवर्ती बसस्थानक प्रवाशांनी गजबजलेले असते. त्यामुळे महिलांना सुरक्षितता मिळणे आवश्यक आहे. याचा विचार करून या बससेवेला पसंती देण्यात आली आहे. मात्र येत्या काळात या विशेष बसने किती महिला प्रवास करणार हेच पाहावे लागणार आहे.
महिला सुरक्षिततेचा विचार
महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करून तीन ठिकाणी विशेष बस सुरू केली आहे. वडगाव, अनगोळ या ठिकाणी बस धावत आहेत. त्याचबरोबर मजगावलादेखील ही बससेवा सुरू केली जाणार आहे. ज्या ठिकाणी महिलांची गर्दी आहे, त्या ठिकाणी ही बस धावणार आहे.
– ए. वाय. शिरगुप्पीकर (डेपो मॅनेजर)