जिल्हा परिषदसाठी कोल्हापूरात तर पंचायत समिती साठी तालुकास्तरावर निघणार आरक्षण
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 28) आरक्षण सोडत काढण्यात येणार असून त्याचे स्थळ व वेळ निश्चित झाले आहे. जिल्हा परिषदेसाठी सकाळी 11 वाजता शासकिय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृहात तर पंचायत समितीसाठी सर्व तालुक्यांच्या ठिकाणी सोडत निघणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी दिले. त्याचबरोबर आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी 9 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंतचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सकाळी 11 वाजता शासकिय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. तसेच पंचायत समितीसाठी ही सकाळी 11 वाजता तालुकास्तरावर ही प्रक्रिया होणार आहे. यामध्ये शाहुवाडीसाठी पंचायत समिती सभागृह येथे, पन्हाळ्यासाठी पन्हाळा गिरिस्थान नगर परिषद, हॉल, मयुरबाग बस स्टँडशेजारी, हातकणंगलेसाठी नवीन प्रशासकिय इमारत पहिला मजला बैठक हॉल, हातकणंगले येथे, शिरोळसाठी तहसील कार्यालय मध्यवर्ती प्रशासकिय इमारत, शिरोळ येथे, कागल येथे बहुउद्देशीय सभागृह, कागल येथे, करवीरसाठी राजर्षी शाहू सभागृह पंचायत समिती, करवीर येथे, गगनबावडासाठी तहसील कार्यालय, नवीन प्रशासकिय इमारत गगनबावडा येथे, राधानगरीसाठी राजर्षी शाहू सभागृह, तहसील कार्यालय, राधानगरी येथे, भुदरगडसाठी दिनकरराव जाधव सभागृह, पंचायत समिती, भुदरगड येथे, आजर्यासाठी मध्यवर्ती प्रशासकिय इमारत, तहसील कार्यालय, आजरा येथे, गडहिंग्लजसाठी शाहू सभागृह, गडहिंग्लज नगरपरिषद येथे, चंदगडसाठी ऑडीटोरिअम हॉल, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत, तहसील कार्यालय चंदगड येथे होणार आहे.
जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांना सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.