सुरेश माने-पाटील यांचे आवाहन : मार्कंडेय कारखान्यातर्फे ऊस उत्पादकांचा मेळावा उत्साहात
बेळगाव : सेंद्रिय खत, आंतर मशागत, दोन सरी व दोन रोपांतील योग्य अंतर, योग्य वेळी लागवड व तोडणी, योग्य नियोजन व व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ऊस उत्पादनात हमखास वाढ होते. शिवाय लवकर लागण करून उशिराने ऊसतोड करा, असे आवाहन पुणे येथील वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटचे माजी शास्त्रज्ञ सुरेश माने-पाटील यांनी केले. काकती येथील मार्कंडेय साखर कारखान्यातर्फे ऊस उत्पादकांचा मेळावा मंगळवारी रेल्वे ओव्हरब्रिज येथील मराठा मंदिरमध्ये पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, संचालक आर. आय. पाटील, सुनील अष्टेकर, शिवाजी कुट्रे, जोतिबा आंबोळकर, बसवराज गाणगेर, बाबासाहेब भेकणे, लक्ष्मण नाईक, संचालिका वनिता अगसगेकर, वसुधा म्हाळोजी, माजी महापौर शिवाजी सुंठकर, मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार, समिती नेते प्रकाश मरगाळे, एम. जी. पाटील आदी उपस्थित होते.
सुरेश माने-पाटील पुढे म्हणाले, ऊस उत्पादन करताना भौगोलिक स्थिती, बियाणे, सुधारित लागवड आणि व्यवस्थापन या बाबी महत्त्वाच्या आहेत. शिवाय एकूण सरासरी उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. नवीन बियाणे कशी तयार करावीत, याबाबत सविस्तर माहिती दिली. उसाची 86032 ही अधिक उत्पादन देणारी जात म्हणून ओळखली जाते. जूनपासून फेब्रुवारीपर्यंत या जातीची लागवड करता येते. 12 ते 18 महिन्यांपर्यंत तोडणी करणेही शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक उत्पादनासाठी या जातीचा वापर करावा. निसर्ग आणि ऋतू बदलामुळे शेती उत्पादनावर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत ऊस उत्पादन वाढविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. उसाला 18 ते 38 डिग्री तापमान आवश्यक आहे. त्यामुळे बेळगाव परिसरात सरासरी एकरी 60 ते 70 टन उत्पादन घेणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आर. आय. पाटील यांनी साखर कारखानाचा सर्वांना विश्वासात घेऊन चालविला जाणार आहे. सर्वांच्या हिताच्या दृष्टिकोनातून पावले उचलली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर व दिगंबर पवार यांनी मनोगत व्यक्त केले. आर. के. पाटील यांनी प्रास्ताविकात ऊस मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाला चालना देण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत पुष्पहार देऊन करण्यात आले. याप्रसंगी सिद्धाप्पा टुमरी, मनोहर होनगेकर, बसवंत मायाण्णाचे, युवराज हुलजी यासह कारखान्याचे सभासद, हितचिंतक, शेतकरी उपस्थित होते.