जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनखात्याचा उपक्रम : ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश
बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनखात्यामार्फत वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील न्यायालय आवार आणि केएलई इंटरनॅशनल स्कूलच्या आवारात रोपांची लागवड करण्यात आली. दरवर्षी पर्यावरण दिनानिमित्त खात्यामार्फत रोप लागवड केली जाते. शिवाय ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश दिला जातो. वनखात्यामार्फत न्यायालय आवारात दहा रोपे तर केएलई इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरात 25 रोपे लावण्यात आली. शहरात झाडांची संख्या कमी होत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढळू लागला आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढे येऊन एक तरी रोप लावावे, असे आवाहन खात्याने केले आहे. न्यायालय आवारात वकील आणि वनखात्याच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच इंटरनॅशनल स्कूलच्या आवारात शिक्षक, विद्यार्थी आणि वनखात्याच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण झाले. यंदाच्या पावसाळी हंगामात वनखाते विविध ठिकाणी लाखो रोपांची लागवड करणार आहे. विशेषत: सरकारी जागा, खुल्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा ही लागवड होणार आहे. शिवाय रोपांच्या संवर्धनासाठी कुंपण आणि वेळोवेळी पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती वनखात्याने दिली. याप्रसंगी उपवनसंरक्षण अधिकारी जी. पी. हर्षाबानू, एसीएफ कबाडगी, आरएफओ पुरुषोत्तम रावजी, विनय गौडर यासह कर्मचारी उपस्थित होते.