संयुक्त मोहिमेतून 7500 रुपये दंड वसूल
प्रतिनिधी /बेळगाव
प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेतर्फे संयुक्तरित्या ऑटोनगर परिसरात प्लास्टिक विरोधी मोहीम राबविण्यात आली. विविध व्यवसायांसह बेकरीमध्ये सिंगलयूज प्लास्टिकचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असल्याने ही कारवाई राबवून प्लास्टिक जप्त करण्यात आले.
तसेच दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शहराच्या विविध भागात प्लास्टिक विक्री आणि प्लास्टिक पिशवीचा वापर सुरू आहे. सिंगलयूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली असतानाही वापर होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आले आहे. विशेषतः ऑटोनगर परिसरातील विविध व्यवसायांसह बेकरीमध्ये सिंगलयूज प्लास्टिकचा वापर करण्यात येत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय असलेल्या परिसरात प्लास्टिकचा वापर होत असल्याने ही कारवाई राबविण्यात आली. महापालिकेच्या अधिकाऱयांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱयांनी विविध दुकानांमध्ये धाडसत्र राबविले. प्लास्टिक जप्त करून दंड वसूल करण्यात आला. तसेच महापालिका आरोग्य विभागाच्यावतीने शहरातील विविध भागातही मोहीम हाती घेतली होती. ठिकठिकाणी कारवाई करून 7500 रुपये दंड वसूल केला.