वार्ताहर /जांबोटी
जांबोटी-खानापूर राज्य मार्गाची दुर्दशा झाली असून या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत असून रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
जांबोटी-खानापूर या 18 कि. मी. रस्त्याचा समावेश जत-जांबोटी राज्यमार्ग क्रमांक 31 अंतर्गत होतो. या रस्त्याचा काही भाग सुस्थितीत आहे. मात्र अतिवृष्टीमुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे दोन वर्षापूर्वी कान्सुली फाटा ते मोदेकोप फाटय़ापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण केले होते. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामकाजामुळे केवळ दोनच वर्षात रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे खड्डे चुकवून वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे.
शंकरपेठ पुलावर खड्डे पडल्याने वाहतुकीला धोकादायक
यामुळे खानापूर-जांबोटी रस्त्यावर दुचाकी व चारचाकीचे अपघात घडत आहेत. मलप्रभा नदीवर शंकरपेठ येथील पुलावर मागीलवर्षी झालेल्या महापुराच्यावेळी आलेल्या पाण्यामुळे रस्ताच वाहून गेला होता. मात्र गेल्या दीडवर्षात संबंधित खात्याकडून या पुलावरील रस्त्याची दुरस्ती केली नाही. त्या पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरील मोऱयांचे दोन वर्षापूर्वी बांधकाम करण्यात आले आहे. मात्र पाण्याच निचरा होण्यासाठी पाईप घालण्यात आलेल्या रस्त्यावरील चरी व्यवस्थित बुजविण्यात गेल्या नसल्यामुळे अनेक ठिकाणी मोरीजवळील रस्ता खचून त्या ठिकाणी भले मोठे खड्डे पडले असल्यामुळे अपघातला निमंत्रण मिळत आहे. जांबोटी-खानापूर महामार्गाची सात-आठ वर्षापूर्वी पुनर्बांधणी करण्यात आली होती.
मात्र या मार्गावरुन हुबळी, धारवाड, गोवा आदी ठिकाणी अवजड वाहतूक मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुर्दशेमध्ये दिवसेंदिवस अधिकच भर पडत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने ताडतीने हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांतून होत आहे.