मुंबई : अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात झालेल्या ऐतिहासिक पोखरण अणूचाचणी प्रक्रियेतील एक महत्वपुर्ण तंत्रज्ञ, भाभा अणूसंशोधन केंद्रातील तांत्रिक पर्यवेक्षक संजय चव्हाण यांचे वाशीतील फोरटीज रुग्णालयात दु:खद निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. आध्यात्मकिदृष्टयाही बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या चव्हाण यांच्या पार्थिवावर जुईनगर येथील सारसोळे मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह भाभा अणुसंशोधन केंद्रातील अधिकारी उपस्थित होते.
संजय चव्हाण यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे ााशीतील फोरटीज रुग्णालयात गेल्या महिन्याच्या प्रारंभी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूत संसर्ग झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले जात होते. अखेर त्यांच्या रक्तदाब घटत जाऊन 8 सप्टेंबर रोजी सकाळी 8.55 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
अधिक वाचा : महाबळेश्वरमध्ये एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न
त्यांचे पार्थिव काही काळ नवी मुंबई मनपा, वाशी रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात येऊन अनंतचतुर्दशी दिनी सकाळी त्यांच्या जुईनगर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर सकाळी 11 वाजता सारसोळे मोक्षधाम स्मशानभूमी येथे विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कन्या संवर्धिनी आणि संतृप्ती यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.