वार्ताहर / केपे
केपे परिसरातील लोकांच्या घरातील पितळेचे हंडे व इतर साहित्य चोरणाऱया विजय जलिगेरी (कुडतरी) आणि राम सिंग (कोंब-नेसाय) या दोन चोरटय़ांना केपे पोलिसांनी अटक केली असून सुमारे 1 लाख 10 हजार रुपये किमतीचे साहित्य त्यांच्याकडून जप्त केले आहे. यात पितळेचे चार मोठे हंडे व इतर साहित्याचा समावेश आहे. मागील काही दिवसांपासून केपे परिसरातील काही भागांतील लोकांनी आपल्या शेतातील भात उकडण्याकरिता पितळेचे मोठे हंडे घराबाहेर ठेवले होते. हीच संधी साधून चोरटे रात्रीच्या वेळी त्यांची चोरी करत असल्याचे दिसून आले होते. केपे पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.