फुटपाथवरील मुलाला पोलिसाकडून शिक्षण
पोलिसांची नोकरी अत्यंत अवघड आहे. वाहतूक पोलिसाला तर कित्येक तास उन्हात उभे रहावे लागते. उन्हाळा असो किंवा पावसाळा नेहमीच ते डय़ुटीवर तैनात असतात. प्रदूषणाचा मार झेलूनही ते स्वतःचे काम करत असतात. अलिकडेच एका वाहतूक पोलिसाच्या कहाणीने लोकांची मने जिंकली आहेत. त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या छायाचित्रात तो स्वतःच्या डय़ुटीसह रस्त्याकडेला एका मुलाला शिकविताना दिसून येत आहे.
दक्षिणपूर्व कोलकात्यातील वाहतूक पोलीस प्रकाश घोष यांचे हे छायाचित्र ट्विटरवर व्हायरल होत आहे. एका स्थानिक पत्रकाराने हे छायाचित्र काढले आहेत. कोलकाता पोलस विभागाने प्रकाश घोष यांची ही कहाणी शेअर केली आहे. प्रकाश हे बालीगंज आयटीआयनजीक डय़ुटी करतात, तेव्हा 8 वर्षांचा मुलगा त्यांना रस्त्यांवर खेळताना दिसून आला. मुलाची आई रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात काम करते, तिने अत्यंत मेहनतीने स्वतःच्या मुलाला शासकीय शाळेत प्रवेश मिळवून दिला होता.
फुटपाथवरच वास्तव्य मायलेक फुटपाथवरच राहतात, परंतु आपला मुलाने गरीबीच्या बेडय़ा तोडून शिक्षणाच्या जगतात नाव कमवावे अशी त्याच्या आईची इच्छा आहे. तिसरीत शिकणाऱया मुलाचा अभ्यासात मन रमत नसल्याने तिच्यासाठी हा एक चिंतेचा विषय ठरला होता. तिने वाहतूक पोलीस घोष यांना स्वतःची समस्या सांगितली. तेव्हापासून घोष या मुलाला दररोज शिकवत आहेत. गणवेशामुळे ते बसू शकत नाहीत, यामुळे उभे राहून ते मुलाला शिकवत असतात.