मिरणुकीत डॉल्बी- डीजेला बंदी, रात्री दहापर्यंतच मिरणुक
वाई / प्रतिनिधी
वाई शहरात बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. बैलांच्या मिरवणुकीदरम्यान पूर्वी वादवादीचे प्रकार घडलेले आहे. कोरोनानंतर वाई शहरात बेंदूर सण साजरा होणार असून या वेळी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये या अनुषंगाने वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी बैठक घेऊन बैल मालकांना सीआरपीसी 149 अनव्ये नोटीस बजावली आहे. बेंदराच्या सणाला डीजे आणि डॉल्बीला बंदी असून समाजविघातक वक्तव्य केल्यास बैल मालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही पोलीस निरीक्षक भरणे यांनी बजावले आहे.
वाई शहरांमध्ये बेंदूर सणाला अनोखे महत्त्व आहे. अगदी पारंपारिक पद्धतीने बेंदूर सण मोठ्या उत्साहात वाई शहरात साजरा केला जातो. बैल मालक आपल्या बैलांची सजावट करून जंगी अशा मिरवणुका काढल्या जातात. या मिरवणुकी दरम्यान यापूर्वी काही वेळा वादावादीचे प्रकार घडले आहेत. त्याच पार्श्वभुमीवर बेंदूर सण शांततेत व उत्साही वातावरणात साजरा व्हावा म्हणून वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी वाईशाहरातील बैल मालकांची बैठक वाई पोलीस ठाण्यात बोलवली होती. या बैठकीमध्ये बैल मालकांनी नेमकी काय तयारी केली आहे हे जाणून घेत त्यांना बेंदूर सणाला वाई शहराची शांतता व कायदा सुव्यवस्था बिघडू नये, या अनुषंगाने काही सूचनांचे पालन करण्याचे विनंती केली दरम्यान शहरातील बैलमालकांना सीआरपीसी 149 अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे त्या नोटीसी प्रमाणे बेंदूर हा हिंदू धर्मियांचा सण दिनांक 12 रोजी होत आहे. या सणांच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकी दरम्यान बैलजोड्या मागेपुढे घेण्यावरून व समोरासमोर बैल जोड्या आल्याने वादावादी होण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे कायदा व संस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये मुंबई पोलीस अधिनियम 37 एक 3 अन्वये शस्त्र व जमाव बंदीचा आदेश लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे बैल मालकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाई पोलिसांना सहकार्य करावे अशी विनंती बाळासाहेब भरणे यांनी केलेले आहे.
अशी आहे नियमावली
बेंदूर सण हा दोन वर्षानंतर मोठ्या प्रमाणावर साजरा होत असल्याने वाई पोलिसांनी नियमावली बनवली आहे ही नियमावली पुढील प्रमाणे आहे, मिरवणुकी दरम्यान कोणत्याही धर्माच्या व जातीच्या भावना दुखावतील असे वक्तव्य करू नये. याची दक्षता घ्यावी, मिरवणूक काढण्यासाठी पोलीस ठाण्याची परवानगी आवश्यक आहे. परवानगीनुसार दिलेल्या वेळेतच मिरवणूक काढण्यात यावी. मिरवणुकीमध्ये डीजे आणि डॉल्बी लावण्यास मनाई आहे. त्यामुळे कोणीही डीजे आणि डॉल्बी लावू नये. रात्री दहाच्या पुढे मिरवणुका काढण्यात येऊ नये. कोणतेही वाद्य रात्री दहाच्या पुढे वाजवू नये, हे नियम मोडल्यास संबंधित बैल मालकांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही दिलेल्या नोटिसामध्ये नमूद केले आहे. दरम्यान उपस्थित बैलमालकानी आम्ही नियमांचे पुरेपूर पालन करू वाई शहरातील बेंदूर सणाला कोणतेही गालबोट लागणार नाही. याची पुरेपूर दक्षता घेऊ असे, आश्वासन त्यांनी वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना दिले.