लोणावळा / वार्ताहर :
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरामध्ये थर्टी फर्स्ट व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेबाबत पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात असून, सुरक्षेच्या कारणास्तव थर्टी फस्ट व न्यू इयरच्या पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.
लोणावळा शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम रहावी तसेच काही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस प्रशासनाकडून शहराच्या एंट्री पॉईंटवर चेकपोस्ट लावत वाहनांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी दिली. डुबल म्हणाले, पर्यटनस्थळे व गर्दीच्या ठिकाणी मद्यप्राशन करुन धिंगाणा घालणारे पर्यटक, वेगात वाहन चालविणारे चालक, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणारे हुल्लडबाज यांच्यावर कारवाई करण्यासाठी वेगळे पथक नियुक्त करण्यात येणार आहेत. महिला छेडछाडीच्या घटना टाळण्यासाठी महिला पोलीस पथके तसेच साध्या वेशातील पोलीस असणार आहेत.
अधिक वाचा; Pune : ESIC रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी 305 कोटींचा निधी मंजूर
पर्यटकांनी लोणावळा, खंडाळा परिसरात आल्यानंतर शासनाच्या आदेशाचे पालन करत आनंदात व उत्साहात नविन वर्षाचे स्वागत करावे. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही अथवा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, सोबत असणाऱ्या लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोणावळ्यात आल्यानंतर पर्यटक हे हॉटेल व खासगी बंगले यामध्ये राहतात. याकरिता हॉटेल व बंगले चालकांची मिटिंग घेत त्यांना सुरक्षेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांचे ओळखपत्र तपासणे, त्यांनी रजिस्टरमध्ये नोंद करणे, मेटेल डिटेक्टर आदी अद्ययावत ठेवणे, हॉटेलचा परिसर सीसीटिव्ही कक्षेत ठेवणे आदी सूचना दिल्या असून, काही अनुचित प्रकार घडल्यास हॉटेल व्यावसायिक व बंगलेचालक यांच्यावर कडक कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे.
कोरोनाच्या अनुषंगाने देखील पर्यटकांना काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. स्थानिक नागरिक, व्यावसायिक, पर्यटक या सर्वांनी शहरात काही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घ्यावी, पर्यटकांच्या व नागरिकांच्या सुरक्षेकरिता पोलीस यंत्रणा सज्ज आहे, असे पोलीस निरीक्षक डुबल यांनी सांगितले.