वाहन पार्किंग समस्येमुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून पोलिसांना सूचना
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरात वाहन पार्किंग करणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. येथे दिवसभर वाहने थांबवून राहात असल्यामुळे इतर वाहनधारकांना पार्किंग करण्यासाठी जागा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण करूनदेखील परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरात वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनांची नोंद करण्याची सूचना रहदारी पोलीस व मनपा अधिकाऱ्यांना केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रादेशिक आयुक्त, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, अन्न व नागरी पुरवठा खाते, न्यायालय आदी सरकारी कार्यालये असल्याने विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. यापूर्वी परिसरात वाहन पार्किंगसाठी सुयोग्य जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्किंग केली जात होती. तसेच निमुळता रस्ता असल्याने वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत होती. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सदर परिसराचा विकास करून वाहनांच्या पार्किंगसाठी योग्य जागा उपलब्ध करून दिली आहे. रस्त्याचे रुंदीकरण केल्याने रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी दूर झाली आहे. असे असले तरी पार्किंगच्या ठिकाणी काही वाहनधारक दिवसभर वाहने थांबवत असल्याने इतर वाहनांना जागा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना रुंदीकरण केलेल्या रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्किंग करावी लागत आहेत. परिणामी पुन्हा वाहतूक कोंडीत भर पडत आहे. बहुतांश चारचाकी वाहने दिवसभर एकाच ठिकाणी थांबून ठेवली जात असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
अनेकजण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहने पार्किंग करून बाजारहाट करीत आहेत. तर जमिनीचे व्यवहार करणाऱ्या एजंटांची वाहने दिवसभर थांबून आहेत. काही जणांनी कारमध्येच कार्यालय थाटले आहे. त्यामुळे इतर वाहनांना पार्किंग करण्यासाठी जागा मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरात पार्किंग करणाऱ्या वाहनांचे क्रमांक नोंद करण्याची सूचना केली आहे. सदर वाहनधारक सरकारी कामानिमित्त की इतर कारणासाठी येऊन वाहने पार्किंग करत आहेत याची पाहणी केली जात आहे.
वाहनांचे क्रमांक नोंद करण्याचे आदेश- नितेश पाटील, जिल्हाधिकारी
सरकारी कामानिमित्त जिल्हाधिकारी परिसरात येणाऱ्या वाहनधारकांच्या वाहनांची नोंदणी करण्याची सूचना रहदारी पोलीस व मनपा अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाण असल्याने पे पार्क करता येणार नाही. मात्र वाहने पार्किंग करून इतर ठिकाणी फिरत असतील तर याची चौकशी केली जाईल.