सरदार्स जवळील कचेरी रोडवरील प्रकार : वाहतूक केंडीमुळे नागरिकांना त्रास
बेळगाव : काकतीवेसकडून सरदार्स महाविद्यालयाजवळून कोर्ट आवारात जाणाऱ्या कचेरी रोडवर दुतर्फा पार्किंग करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जवळच असणाऱ्या रहदारी पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सरदार्स महाविद्यालयाच्या बाजूने कोर्ट आवारात जाणाऱ्या रस्त्यावर चारचाकी वाहनधारकांकडून दुतर्फा वाहने पार्किंग करण्यात येत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना वारंवार वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. रस्ता अरुंद असतानाही दुतर्फा पार्किंग करण्यात येत असल्याने ही समस्या निर्माण होत आहे. जवळच चन्नम्मा चौकात रहदारी पोलीस असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. एरव्ही रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या वाहनांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. कचेरी रोडवर होणाऱ्या बेकायदेशीर पार्किंगकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. रहदारी पोलिसांनी याकडे लक्ष देऊन समस्या निकालात काढाव्यात, दुतर्फा पार्किंगला मज्जाव करावा, अशी मागणी होत आहे.