गोवा ज्वेलर्स संघटनेची म्हापसात झालेल्या बैठकीत माहिती : मुख्यमंत्र्यांनी या लक्ष घालण्याची मागणी,यापुढे असा प्रकार झाल्यास भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय
म्हापसा : परराज्यातील पोलीस राज्यात येऊन चोरीचा माल विकत घेतल्याचे सांगून सराफी दुकान मालकांना त्रास देतात. त्यांच्याकडून 7 ते 10 ग्रॅम सोने चोरीचे म्हणून घेऊन जातात. या प्रकारात सध्या वाढ झाली असून यापुढे असे प्रकार घडल्यास गप्प बसणार नाही. परराज्यातील चोरट्यांनी व पोलिसांनी संघनमताने केलेला हा कुटील डाव आहे, अशी माहिती गोल्ड ज्वेलर्स असोसिएशन व अखिल गोमंतक दैवज्ञ सुवर्णकार कारागिर संघानी दिली. म्हापसा त्रिमुर्ती सभागृहात संघटनांची संयुक्त बैठक सोमवारी झाली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष समीर कुडतरकर अध्यक्षस्थानी होते. यापुढे परराज्यातील पोलिसांना आम्ही कदापि आमच्या सराफी दुकानात नाहक घुसू देणार नाही. स्थानिक पोलिसांनी आम्हाला परराज्यातील पोलिसांपासून संरक्षण द्यावे, अशी एकत्रित मागणी बैठकीत करण्यात आली.
धमकी देऊन लुटतात
शनिवारची संध्याकाळची वेळ साधून आपण परराज्यातील पोलीस असल्याचे भासवून चोरट्यासमवेत हे पोलीस दुकानात घुसतात व बाहेऊन शर्टस बंद करतात. त्यांच्यासोबतचा चोरटा या सोनारास पाच, दहा ग्रॅम सोने विकल्याचे सांगतो. प्रत्यक्षात त्या चोरट्याने सोने विकलेलेच नसते. आतमध्ये दुकान मालकाकडून मोबाईल काढून घेतले जाते तसेच या चोरीप्रकरणी तुम्हाला सांगली, कोल्हापूर, कर्नाटक आदी ठिकाणी घेऊन जाणार अशी धमकी देतात. अन्यथा दहा, वीस ग्रॅम सोन्याची मागणी करतात. भीतीपोटी सराफी दुकान मालकाला सोने द्यावे लागते, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष समीर कुडतरकर यांनी दिली. या वसुलीनंतर पोलीस कोणतीच पावती देत नाहीत. पावती दिली तरी कन्नड व इतर भाषेत देतात. ते सराफी दुकानदारास समजत नाही. पोलिसांनी 200 ग्रॅम सोने नेले तर 20 ग्रॅमची पावती देतात. चोरटेही हुषार असतात. तेही नाहक या सोनाराला 200, 300 ग्रॅम सोने विकल्याचे सांगतात. यात पोलिसांची मिलीभगत असते. सराफी दुकानदार घाबऊन त्याना सोने देतात. ही एकप्रकारे आमची लूट असल्याची माहिती सराफींनी बैठकीत दिली.
कायद्याचे पालन कऊनही सतावणूक
सराफी दुकानदार कायद्याप्रमाणे सीसीटिव्ही फुटेज, सोने विकण्यासाठी येणाऱ्याची फोटोकॉपी, परवाना वा आधारकार्ड आदी नियम पाळूनच आपला व्यवसाय करत असतात. तरीही परराज्यातील पोलिसांकडून आमची सतावणूक होत आहे. स्थानिक पोलीस आम्हाला सहकार्य करतात. परराज्यातील पोलीस थेट अधिक्षकांशी संपर्क साधून दोन पोलीस शिपाई सोबत घेऊन थेट धाड घालतात, अशी माहिती त्यांनी दिली.
दोघाच चोरट्यांचा वसुलीसाठी वापर
ठराविक दोनच चोर आहेत ज्यांचा वापर परराज्यातील पोलीस आमच्याकडून वसुलीसाठी करतात. एक सांखळीचा व अन्य दुसरा. महाराष्ट्र, कर्नाटकातील पोलीस याच चोरट्यांना घेऊन येऊन आम्हाला धमकी देतात व लुबाडतात, असा आरोप सराफी दुकानदारांनी यावेळी केला.
पोलीस उपअधिक्षकांना निवेदन सादर
दरम्यान, या ज्वेलर्स संघटनेने म्हापसा पोलीस उपअधिक्षक जिवबा दळवी व निरीक्षक सीताकांत नायक यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले. तसेच संध्याकाळी सर्व सराफी दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून परराज्यातील पोलिसांचा निषेध व्यक्त केला.