पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संसद भवनाच्या नविन इमारतीच्या उद्घाटन समारंभा औचित्याने टपाल तिकीट आणि 75 रुपयाच्या विशेष नाण्याचे अनावरण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संसद भवनाच्या नविन इमारतीचे उद्धाटन झाले आहे. यासाठी संसदेमध्ये एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. य़ा उद्घाटनाचे औचित्य साधून भारत सरकारकडून टपाल तिकिटाचे आणि 75 रुपयाच्या नाण्याचे अनावरण करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> नव्या भारताच्या आकांक्षांचे प्रतिबिंब; पंतप्रधानांकडून नवीन संसदेचे अनावरण
आर्थिक व्यवहार विभागाने जारी केलेल्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार नाण्याचे वजन सुमारे 34.65- 35.35 ग्रॅम आहे. त्यावर मध्यभागी अशोक स्तंभाच्या सिंहाची राजमुद्रेची प्रतिमा असून त्यावर देवनागरी लिपीत “भारत” आणि इंग्रजीमध्ये “इंडिया” असे शब्दांकन केले आहे. तसेच नाण्याच्या दुसऱ्या बाजूवर संसदेची प्रतिमा आणि वर्ष 2023 चा उल्लेख आहे.”
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “नवीन संसदेची गरज होती. आगामी काळात खासदारांची संख्या वाढेल म्हणूनच नवीन संसद बनवणे ही काळाची गरज होती.”