मळा भागात मलनिस्सारण वाहिनी दुरुस्तीवेळी घटना
प्रतिनिधी/ पणजी
राजधानीतील मळा भागात मलनिस्सारण वाहिनी दुरुस्तीच्या प्रयत्नात उच्च दाबाची भूमिगत वीजवाहिनी तुटल्यामुळे शनिवारी दिवसभर पणजी आणि सभोवतालच्या परिसरात वीजपुरवठा खंडित झाला.
प्राप्त माहितीनुसार मळा भागात पेट्रोल पंपजवळ मलनिस्सारण वाहिनी दुरुस्तीचे काम सुरू होते. त्या दरम्यान तेथील जुन्या साकवाचा स्लॅब कोसळला. या साकवाच्या खालूनच उच्च दाबाच्या भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. कोसळलेल्या स्लॅबखाली या वाहिन्या दबल्यामुळे त्यांची नुकसानी झाली. राजधानीसाठी वीजपुरवठा करणाऱया या प्रमुख वाहिन्या असल्याने कांपाल, मिरामार, टोंक, करंजाळे, मार्केट, आदी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.
दरम्यान, सदर माहिती वीज खात्याला मिळताच सर्व उच्चपदस्थ अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. त्यामुळे रात्री उशिरांपर्यंत तेथे दुरुस्तीकाम सुरू होते.
वाहिन्यांची दुरुस्ती आज होणार ः कार्यकारी अभियंता
यासंबंधी अधिक माहितीसाठी कार्यकारी अभियंता अरुण पाटील यांच्याशी संपर्क केला असता वीजवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या उकाडा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे आधीच लोक हैराण होत आहेत. त्यात वीज नसेल तर झोप घेणेसुद्धा अशक्य होईल याची जाणीव असल्याने शनिवारी रात्री तात्पुरती दुरुस्ती करून वीजपुरवठा चालू ठेवण्यात आला होता. रविवारी सकाळी या वाहिन्यांची कायमस्वरुपी दुरुस्ती करण्यात येईल, असे श्री. पाटील यांनी सांगितले.