वृत्तसंस्था/ कोलकाता
शारदा मठ आणि रामकृष्ण शारदा मिशनच्या अध्यक्ष प्रब्रजिका भक्तिप्राणा यांचे रविवारी रात्री 11 वाजून 24 मिनिटांनी निधन झाले आहे. निधनासमयी त्या 102 वर्षांच्या होत्या. दक्षिण कोलकात्यातील रामकृष्ण मिशन सेवा संस्था रुग्णालयात त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. प्रब्रजिका भक्तिप्राणा या शारदा मठच्या सर्वात वृद्ध संन्यासिनी होत्या. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
प्रब्रजिका भक्तिप्राणा या श्री शारदा मठ आणि रामकृष्ण शारदा मिशनच्या चौथ्या अध्यक्ष होत्या. त्यापूर्वी त्या मातृभवन रुग्णालयाच्या सचिवपदावर कार्यरत होत्या. प्रब्रजिका भक्तिप्राणा यांना कल्याणीधि या नावानेही ओळखले जायचे. 1959 मध्ये त्यांनी रामकृष्ण मठ आणि मिशनचे सातवे अध्यक्ष स्वामी शंकरानंद यांच्याकडून संन्यासाची दीक्षा घेतली होती. शारदा मठाला त्याचवर्षी एक स्वतंत्र संघ म्हणून मान्यता देण्यात आली होती.