इस्रोकडून पहिले ‘स्माईल प्लीज!’ जारी
वृत्तसंस्था/ बेंगळूर
चांद्रयान-3 मोहिमेतील ‘प्रज्ञान’ रोव्हरने ‘विक्रम’ लँडरचे छायाचित्र घेतले आहे. हा फोटो शेअर करताना इस्रोने ‘स्माईल प्लीज!’ अशी ‘टॅगलाईन’ वापरली आहे. रोव्हरवर बसवण्यात आलेल्या नेव्हिगेशन पॅमेऱ्याने हे छायाचित्र काढल्याचे इस्रोने सांगितले. इलेक्ट्रो ऑप्टिक्स सिस्टम्सच्या प्रयोगशाळेने हा विशेष पॅमेरा विकसित केला आहे. ‘प्रज्ञान’ रोव्हरने बुधवार, 30 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 7.35 वाजता हा फोटो घेतला आहे.
इस्रोची चांद्रयान-3 मोहीम सतत चंद्राशी संबंधित मनोरंजक माहिती पाठवत आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत असलेल्या चांद्रयान-3 मोहिमेच्या रोव्हर प्रज्ञानने दक्षिण ध्रुवावर सल्फरच्या अस्तित्वाची पुष्टी केली आहे. रोव्हरने चंद्रावर काही विशेष घटक शोधले आहेत. आता ते चंद्राच्या पृष्ठभागावर अन्य ठिकाणी जाऊन तेथील घटकांची रचना आणि एकाग्रतेबद्दल माहिती मिळवणार असल्याचे अंतराळतज्ञ टी. व्ही. वेंकटेश्वरन यांनी सांगितले.
यापूर्वी चांद्रयान-1, चांद्रयान-2 यांच्यासह अमेरिकेच्या परिभ्रमणकर्त्यांनी रिमोट सेन्सिंग आणि मॅपिंगद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर खनिजांच्या उपस्थितीबद्दल माहिती दिली आहे, परंतु रिमोट सेन्सिंग चंद्राच्या पृष्ठभागापासून बराच दूर असल्यामुळे चंद्रावर काही ठिकाणी उतरून प्रत्यक्ष पाहणी करण्याची गरज होती. त्यानुसार आता भारताच्या चांद्रयान-3 ने अचूक आणि ठोस माहिती पुरवल्यानंतर रिमोट सेन्सिंगच्या दाव्याला दुजोरा मिळाला. तरीही नजिकच्या काळात दोन्हींकडून मिळालेली माहिती जुळल्यानंतरच रिमोट सेन्सिंग डेटावरील विश्वास दृढ होणार आहे.