पंजाबचे माजी मुख्यमंत्री चंदीगडच्या रुग्णालयात दाखल ः डॉक्टरांकडून उपचार सुरू
वृत्तसंस्था / चंदीगड
पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना चंदीगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक 95 वर्षीय प्रकाश सिंह बादल यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहे. मागील 2-3 दिवसांपासून त्यांना ताप आला होता. त्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या आरोग्याची तपासणी करविली होती. रुग्णालयात त्यांच्यावर अनेक वैद्यकीय चाचण्या केल्या जात असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
प्रकाश सिंह बादल हे जानेवारी महिन्यात वैद्यकीय तपासणीसाठी लुधियाना येथील खासगी रुग्णालयात गेले होते. तेव्हा ते कोरोनाबाधित असल्याचे समोर आले होते. उपचारानंतर ते कोरोना संक्रमणातून मुक्त झाले होते. त्यानंतर मोहाली आणि चंदीगड येथील रुग्णालयात त्यांच्या प्रकृतीच तपासणी करण्यात आली होती.
प्रकाश सिंह बादल हे 5 वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 1977 मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी ते 43 वर्षांचे होते. प्रकाश सिंह बादल यांनी अलिकडेच पार पडलेली विधानसभा निवडणूक लंबी मतदारसंघात लढविली होती. परंतु आम आदमी पक्षाचे उमेदवार गुरमीत सिंह खुड्डियां यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यापूर्वी बादल हे लंबी मतदारसंघात 11 वेळा विजयी झाले होते.