कसबा बीड / प्रतिनिधी
कोगे तालुका करवीर येथील कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक व ज्योतिर्लिंग विकास सेवा संस्थेचे चेअरमन प्रकाशराव कुंडलिक पाटील यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले. ते दिवंगत कै. दत्तात्रय पांडुरंग पाटील (मास्तर) यांचे पुतणे होते. कोगे गावातील विविध संस्थेच्या माध्यमातून विकास पर्व सुरू केलेले कै. दत्तात्रय पाटील यांच्यानंतर त्यांनी ही धुरा अतिशय चांगल्या व मैत्रीपूर्ण संबंधामध्ये जपली होती.
प्रकाशराव पाटील हे सांगरूळ शिक्षण संस्थेच्या श्रीराम हायस्कूल येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. सेवेत असताना व निवृत्तीनंतरसुद्धा त्यांनी समाजकारण व राजकारण या क्षेत्रामध्ये आपला एक वेगळाच ठसा उमटवला. कोगे गावातील ग्रामपंचायत, ज्योतिर्लिंग विकास सेवा संस्था, दत्तात्रय पांडुरंग पाटील दूध संस्था, भावेश्वरी महिला दूध संस्था, अशा विविध संस्थांमध्ये ते मार्गदर्शक राहून त्यांनी कोगे गावाची विकासगंगा अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली होती. अशा मैत्रीपूर्ण, उत्कृष्ट संभाषण कौशल्य, सर्वसामान्याला मदत करणारा नेता आज हृदयविकाराच्या झटक्याने निघून गेल्यामुळे कोगे गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व भावंडे असा मोठा परिवार आहे.