ऑनलाईन टिम / नवी दिल्ली
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शनिवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांसमोर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर सादरीकरण केले. सोनियांनी स्थापन केलेल्या तीन सदस्यीय समितीने त्याचा अभ्यास करून आठवड्याभरात अहवाल सादर केल्यानंतर रणनीतीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
सोनिया यांनी पक्षाचे सर्वोच्च नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी वड्रा, ए.के.अँटोनी, मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल, अंबिका सोनी, दिग्विजय सिंग आणि अजय माकन यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
“प्रशांत किशोर यांनी काँग्रेस प्रमुखांना 2024 च्या निवडणुकीच्या रणनीतीचे तपशीलवार सादरीकरण केले आहे. त्यांनी सादर केलेल्या योजनेचा काँग्रेस प्रमुखांनी स्थापन केलेल्या पॅनेलद्वारे आढावा घेतला जाईल. या पॅनेलला एका आठवड्यात अहवाल सादर करण्यास सांगितले गेले आहे,” काँग्रेस महासचिव (संघटन) वेणुगोपाल यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
या वर्षाच्या अखेरीस गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर पुढच्या महिन्यात ‘चिंतन शिबिर आयोजित केले आहे या दरम्यान पक्ष तयारी करत असताना ही बैठक झाली.