बाजार फुलत आहेत. बागायतदार बाजार, सुपर मार्केटमध्ये लोकांची झुंबड. विविध सजावटीच्या दुकानांमुळे बाजार आकर्षक. गणेशमूर्ती शाळांमध्ये रात्री जागत आहे.
डिचोली/प्रतिनिधी
अवघ्याच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश चतुर्थी या गोमंतकीयांच्या प्रिय सणाच्या तयारीला सर्वच पातळीवरून वेग आलेला आहे. गणेश चतुर्थीच्या सामानाने बाजारांचे आकर्षण वाढत आहे. विविध सजावटीच्या पताका, मखरे व विद्यूत उपकरणांच्या झगमगाटामुळे बाजार फुलत चालला आहे. कडधान्य व इतर सामानांच्या खरेदीसाठी बाजारातील सर्व किराणा दुकाने, बागायतदार बाजार, सुपर मार्केटमध्ये लोकांची अक्षरशः झुंबडच पहायला मिळत आहे. असह्य महागाईतही कोणतीही कसूर न ठेवता हा प्रिय सण साजरा करण्यासाठी सर्वचजण सज्ज होत आहेत.
गणेश चतुर्थी हा सर्वांचाच प्रिय सण. पर्यावरणाच्या रक्षणाचा सदैव संदेश देत निसर्गदेवतेची पुजा करण्यासाठी सर्वांनाच प्रेरीत करणाऱया या सणाची गोमंतकीयांना आतुरतेने वाट पाहत असतो. श्रावण महिना सुरू होताच गणेश चतुर्थीची चाहूल व वेध वेग धरू लागते. सणांचा मास श्रावण संपताच भाद्रपदातील गणेश चतुर्थी सणाचीच पर्वणी लाभत असते. शनिवारी अमावस्या संपताच भाद्रपद मासाला प्रारंभ झाला असून थेट गणेश चतुर्थी उत्सवाची आतुरता वाढली आहे.
या उत्सवानिमित्त डिचोली साखळी बाजारातील वातावरणात चतुर्थीचे वातावरण पसरले आहे. बाजारात अनेक नवनवीन सजावटीच्या वस्तू, रेडीमेड रंगीत पताका, आकर्षक विद्यूत रोषणाईची उपकरणे यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. या दुकानांमध्ये लोकांचीही गर्दी वाढत चालली आहे. घराघरांमध्येही गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. गणेशाच्या बसकेभोवतीची सजावट, आरास, मखर तसेच काही ठिकाणी देखावे करण्यात कलाकार दंग असल्याचे दिसून येत आहे.
गणेश चतुर्थीच्या काळात घराघरांमध्ये पंचपक्वान खाद्यपदार्थ तयार करण्यात येते. यासाठी सध्या बाजारातील किराणा दुकानांवर लोकांची गर्दी वाढत आहे. डिचोली व साखळीतील बागायतदार बाजारात तसेच सुपर मार्केटमध्ये खरेदीसाठी लोकांची तर अक्षरशः झु?बड दिसून येत आहे. बागायतदार बाजारांमध्ये हातात बास्केट घेऊन फिरायला सुध्दा वाट मिळत नाही. साखळीतील बागायतदार बाजारामध्ये तर लोकांना माल खरेदी करताना बास्केटही उपलब्ध नसल्याने आढळून आले.
या उत्सवातील प्रमुख आकर्षण असलेल्या गणेश मूर्ती बनवाण्याच्या कामाने वेग धरला आहे. प्रत्येक गणेश मूर्ती शाळेत सध्या कलाकार गणेश मूर्ती रंगविण्यात व्यस्त आहेत. यावषी चतुर्थी लवकर असल्याने कामाचा ताण जबरदस्त वाढला आहे. त्यामुळे गणेश चित्रशाळेतील कलाकार रात्री जागवू लागले आहेत.
घरांमधील तयारीबरोबरच संबंधित नगरपालिका पंचायत पातळीवरही तयारीला वेग आलेला आहे. सर्वत्र साफसफाई तसेच डिचोली व साखळी बाजारात येत्या दोन दिवसांमध्ये भरणाऱया चतुर्थीच्या बाजारात लोकांना वाहतूक आणि फिरण्यास त्रास होऊ नये यासाठी दोन्ही नगरपालिकांकडून तात्पुरती उपाययोजना राबविण्यात आहेत. परिसराची, रस्ता पायवाटांची साफसफाई जोरात सुरू आहे. गणेश विसर्जन स्थळांचीही साफसफाई, शेवाळ होऊन घसरण झालेल्या ठिकाणी ब्लािचिंग पावडर घालून घसरण दूर करण्याचे कामही सुरू आहे. गावात सर्वत्र वीज व्यवस्थेची सोय करण्यात येत आहे.
गणेश चतुर्थी काळात सर्वात जास्त विक्री होणाऱया मिठाई, फुले, फळे व भाजी यांची आवक येत्या दिवसांमध्ये वाढविण्यात आली आहे. मोठय़ा प्रमाणात या वस्तूंची ऑर्डर देण्यात आली आहे. लोकांना या वस्तूंची कमतरता भासू नये यासाठी विपेते दक्षता बागळत आहेत. एकूणच सर्व पातळीवरील तयारीला जोर आलेला आहे.