प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पाच लाख रामभक्तांची उपस्थिती अपेक्षित, हॉटेल्सचे बुकिंग आतापासून हाऊसफुल्ल
वृत्तसंस्था/ अयोध्या, नवी दिल्ली
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या तयारीला वेग आला आहे. रामलल्लाचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा जानेवारी 2024 मध्ये भव्य गर्भगृहात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याला सर्वसमावेशक स्वरूप देण्याच्या आराखड्यावर काम सुरू आहे. त्याची कमान राम मंदिर ट्रस्टसह संघ आणि विहिंपकडे आहे. या उत्सवासाठी सुमारे पाच लाख लोक अयोध्येत येऊ शकतात, असा अंदाज आहे. अयोध्येत येणाऱ्या लोकांच्या स्वागतासाठी स्थानिक प्रशासनाकडून सर्व सोयी-सुविधांची सज्जता आतापासूनच केली जात आहे.
मंदिर ट्रस्ट आणि संघाचे पदाधिकारी सातत्याने बैठका घेऊन जानेवारीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची रुपरेषा तयार करत आहेत. अयोध्येत येणारा एकही भाविक उपाशी राहू नये, असा संघाचा प्रयत्न आहे. संपूर्ण शहरात विविध ठिकाणी भंडारा आयोजित करण्याची तयारी सुरू आहे. रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 10 दिवसांचा असेल. 15 जानेवारीला मकरसंक्रांतीला हा उत्सव सुरू होईल आणि 24 जानेवारीला सांगता होईल, अशी माहिती व्यवस्थापनातील सूत्रांनी दिली. अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीच्या अभिषेक सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचाराचे नियोजन करण्यात आले आहे. या उत्सवाची माहिती देणारे पोस्टर्स आणि होर्डिंग्ज देशभरात लावली जातील.
अयोध्येतील भव्य सोहळ्याचे मुख्य यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. त्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या सोहळ्याच्या कालावधीत देश-विदेशातील पाहुणे येणार असल्याने प्रचंड गर्दी होऊ शकते. वाढत्या गर्दीच्या शक्यतेमुळे अयोध्येत येण्याऐवजी आपापल्या भागातील मठ आणि मंदिरांमध्ये धार्मिक विधी आयोजित करून उत्सव साजरा करण्याचे आवाहन व्यवस्थापनाकडून देण्यात आले असले तरीही मोठ्या संख्येने लोक येण्याची शक्मयता आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी योजनेवर सातत्याने मंथन सुरू आहे.
हॉटेल्स, धर्मशाळांमध्ये बुकिंगची घिसाडघाई
जानेवारी 2024 मध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या संभाव्य उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील ट्रॅव्हल एजंट अयोध्येकडे डोळे लावून बसले आहेत. 10 जानेवारी ते 26 जानेवारीदरम्यान हॉटेल, गेस्ट हाऊस आणि धर्मशाळांमध्ये बुकिंगसाठी विनंत्यांचा प्रचंड ओघ सुरू आहे. बुकिंगची मागणी वाढल्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि ट्रॅव्हल एजंट्सनी आपले दरही वाढवल्याचे दिसून येत आहे. ट्रॅव्हल एजंटांनी जास्त दर आकारून आणि आगाऊ पैसे देऊन संपूर्ण हॉटेल बुक करण्याचा धडाकाही सुरू केला आहे. तर काही ट्रॅव्हल कंपन्यांनी बुकिंगसाठी स्थानिक एजंटना कामाला लावले आहे.
प्रशासनाकडून आढावा
सध्या अयोध्येत एक पंचतारांकित, दोन फोरस्टार आणि 12 थ्रीस्टार हॉटेल्ससह 100 हून अधिक हॉटेल्स आहेत. याशिवाय, शहरात 50 अतिथीगृहे आणि तेवढ्याच धर्मशाळाही आहेत. स्थानिक लोकही पुरेशी जागा असलेली त्यांची घरे होमस्टेमध्ये बदलत आहेत. अयोध्येच्या आसपासच्या गोंडा, बलरामपूर, तारबगंज, डुमरियागंज, तांडा, मुसाफिरखाना, बन्सी इत्यादी ठिकाणी बुकिंगचे पर्याय उपलब्ध आहेत. दरम्यान, हॉटेल मालकांनी आपली ठिकाणे स्वच्छ ठेवावीत आणि भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज राहावे, असे निर्देश अयोध्या प्रशासनाने दिले आहेत.
रामभक्तांसाठी रोडवेज बसेसचा वापर
प्राणप्रतिष्ठा महोत्सवासाठी अयोध्येत येणाऱ्या लोकांच्या मुक्कामासाठी मठ आणि मंदिरांव्यतिरिक्त शाळा आणि महाविद्यालयांमध्येही व्यवस्था केली जाऊ शकते. भाविकांच्या वाहतुकीसाठी रोडवेज बसेसची मदत घेण्याचे नियोजन केले जात आहे. गरज भासल्यास स्थानिक प्रशासनासह संघाचे कार्यकर्तेही भाविकांच्या सोयीसाठी कमान सांभाळतील. संघ कार्यकर्त्यांच्या टीमही तयार केल्या जात आहेत.