कुंडल/वार्ताहर
कुंडल(पलूस) येथे अनंत चतुर्दशीनंतर महाराष्ट्र कुस्ती मैदान यंदा ११ सप्टेंबरला होत असून त्या मैदानाची जय्यत तयारी पुर्ण झाली आहे. महाराष्ट्र कुस्ती मैदानाचे हे शतक महोत्सवी वर्ष असून परंपरेप्रमाणे ११ सप्टेंबरला होत आहे. तीन वर्षे यात्रा नसल्याने यात्रा कमिटीही मोठ्या उत्साहाने कामाला लागली असून या मैदानासाठी देशभरातून मोठे मल्ल एकमेकांना भिडणार आहेत.
रविवारी होणाऱ्या कुस्ती मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची क्रांती कामगार केसरी ही कुस्ती पंजाबच्या गुरुभक्तीनाथ आखाड्याचा मल्ल गौरव मछवाडा विरुद्ध दिल्लीच्या सोहनी आखाड्याचा मल्ल अजय गुज्जर यांच्यात होत असून तर महेंद्र आप्पा लाड मित्र मंडळ व हैबतराव बापू लाड यांच्या वतीने द्वितीय क्रमांकाची कुस्ती कोल्हापूरच्या शाहु कुस्ती केंद्राचा मल्ल पृथ्विराज पाटील विरुद्ध दिल्लीच्या छत्रसाल आखाड्याचा मल्ल मोनु खुराना यांच्यात तर तृतीय क्रमांकासाठी पुण्याच्या काका पवार तालमिचा मल्ल किरण भगत विरुद्ध गंगावेश, कोल्हापूरचा मल्ल माऊली जमदाडे तर बाला रफीक शेख विरुद्ध मोनु दहिया( दिल्ली) यांच्यात ही कुस्ती होणार आहे. यासह जवळपास ३०० च्या वर कुस्त्या होणार आहेत.
क्रांतिअग्रणींच्या जन्मशताब्दिनिमित्त विशेष कुस्ती…
क्रांतीअग्रणी स्व. जी.डी.बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष कुस्ती दिल्ली च्या सतपाल आखाड्याचा मल्ल पै. सुमित मलिक विरुद्ध इराण च्या मुल्लापूर आखाड्याचा मल्ल मिरझा इराण यांच्यामध्ये विशेष कुस्ती होणार असून ही कुस्ती क्रांती उद्योग समुहाचे प्रमुख आमदार अरुण अण्णा लाड व त्यांच्या सर्व कुटूंबियांच्यावतीने लावण्यात येणार आहे.