जुनी इमारत राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर : स्थानिकांसह पर्यटकांनाही राहणार खुली
प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील पोर्तुगीजकालीन वैभवसंपन्न इमारतींचा मुकुटमणी असलेली दोनापावल येथील काबो राजनिवासावरील इमारत राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आली आहे. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी बुधवारी ही घोषणा केली. तसेच नवीन राजभवन बांधून पूर्ण झाल्यानंतर विद्यमान इमारत पर्यटकांसाठी खुली करण्यात येईल असेही राज्यपालांनी जाहीर केले.
राजभवनची विद्यमान इमारत सक्षम असली तरीही देशातील बहुतेक राजभवनसाठी नवीन इमारती बांधण्यात येत असल्याने गोव्यासाठीही तशी इमारत बांधण्यात यावी, असा प्रस्ताव होता. गत गोवा भेटीवेळी स्वतः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीच राजभवनसाठी नवीन इमारत असावी, असे सूचविले होते. हे स्वप्न आता लवकरच सत्यात येणार असून आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
काल बुधवारी दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते नव्या राजभवनची पायाभरणी करण्यात आली. त्यानंतर आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर यांच्यासह अन्य मंत्री, आमदार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
घटनात्मक बदलामुळे राष्ट्रपतींचे भाषण नाही
आपल्या भाषणादरम्यान राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाबाबत काही घटनात्मक बदल लागू होत असल्याने या कार्यक्रमात त्यांचे भाषण होणार नाही, असे स्पष्ट केले. गोव्यासाठी नवीन राजभवन निर्माण होत आहे हे आपणासाठी भूषणावह असून हा क्षण गोव्याच्या इतिहासातील सुवर्णक्षण असेल असे गौरवोद्गारही राज्यपालांनी काढले.
गोवेकरांना मिळणार केंद्राच्या नोकऱया
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आपल्या भाषणातून त्यांनी केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या दहा लाख नोकऱयांमधील काही नोकऱया गोमंतकीयांनाही मिळतील, असे आश्वासन दिले. त्याचबरोबर राज्य सरकारने विकासाची दशसूत्री अवलंबिली असून केंद्र तसेच राज्य सरकारच्या सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यंत सरकार कटिबद्ध असल्याचे जाहीर केले.
गोव्यात सामान्य माणूस गर्भगृहात जातो : पिल्लई
आपल्या दहा महिन्यांच्या गोव्यातील वास्तव्यात निम्म्याहून अधिक भागांना भेट दिली आहे. येथील शहरांपेक्षा ग्रामीण भाग अधिक सुंदर, वैभवसंपन्न आहेत. येथील लोक कष्टकरी असले तरीही त्यांनी आजही आपली लोकसंस्कृती टिकवून ठेवली आहे. म्हणुनच अनेक मंदिरात आजही सामान्यातील सामान्य माणूस गर्भगृहात जाऊन देवाची पूजा करताना दिसून आला, असे राज्यपाल पुढे म्हणाले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते नवीन राजभवन इमारतीची पायाभरणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या सौभाग्यवती सविता कोविंद, राज्यपाल पिल्लई आणि त्यांच्या सौभाग्यवती रिटा श्रीधरन, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱया रूपा धारवाडकर यांनीच शेवटी आभारप्रदर्शन केले.
राजभवनचा अल्प इतिहास
काबोवर असलेल्या विद्यमान चॅपेल आणि इमारतीची बांधणी 1541 मध्ये करण्यात आली. सदर इमारत ही कॉन्व्हेन्ट म्हणून वापरात आणण्यासाठी बांधण्यात आली होती. त्यानंतर 1844 मध्ये ते कॉन्व्हेंट आर्चबिशपसाठी निवास म्हणून वापरात आणण्यात आले आणि त्यानंतर 1866 मध्ये त्याचे पोर्तुगीज गव्हर्नरसाठी निवास म्हणून परावर्तीत करण्यात आले.
असे असेल नवीन राजभवन
एकमजली इमारत स्वरुपातील या प्रकल्पास पोर्तुगीजकालीन बांधकामाचेच स्वरूप देण्यात येणार असून राज्यातील अस्तित्वात असलेल्या पोर्तुगीजकालीन असंख्य इमारतींच्या बांधकाम पद्धतींचा संगम या इमारतीत पाहावयास मिळणार आहे. इमारतीच्या तळमजल्यावर राज्यपाल निवास, मास्टर बॅडरूम, लिव्हिंग रूम, स्वयंपाकघर, कार्यालय, व्हीआयपींसाठी दोन कक्ष, राज्यपालांचे कर्मचारी, राष्ट्रपतींचे डय़ुटीवरील कर्मचारी, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, यासारखी व्यवस्था असेल.
पहिल्या मजल्यावर राज्यपाल निवास, मास्टर बॅडरूम, लिव्हिंग रूम, स्वयंपाकघर, कार्यालय, व्हीआयपींसाठी दोन कक्ष यांसह सचिव, संयुक्त सचिव, नियंत्रक, नियंत्रण कक्ष, कर्मचारी कार्यालये, बँन्क्वेट हॉल यासारखी व्यवस्था असेल.