प्रतिनिधी /बेळगाव
केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित इंडो-अमेरिकन प्रेस क्लबच्यावतीने जीवनगौरव पुरस्कार बहाल करण्यात आला. दि. 21 मे रोजी न्यूयॉर्क येथे हा पुरस्कार वितरित करण्यात आला.
उत्तर कर्नाटक व महाराष्ट्रातील खासकरून ग्रामीण भागातील जनतेला उत्तम शिक्षण व आरोग्य सेवा पुरवून समाज व राष्ट्रनिर्माण कार्यात डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे.
न्यूयॉर्क येथील भारतीय दूतावासात प्रेस क्लब ऑफ यूएसएने हा कार्यक्रम आयोजित केला होता. दूतावासाचे कौन्सिल जनरल रणधीर जयस्वाल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. न्यूयॉर्कचे माजी महापौर बिल देब्लासियो, भारतीय उद्योजक व न्यूयॉर्कमधील आर्थिक विकास मंडळाचे सदस्य पाम क्वॉत्रा आदी यावेळी उपस्थित होते.
शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात झेवियर विद्यापीठाचे अध्यक्ष रविशंकर, कॅन्सरतज्ञ पद्मश्री डॉ. दत्तात्रय, इंडो-अमेरिकन प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष कमलेश मेहता आदी उपस्थित होते.