आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंचा दावा : मागण्यांपासून माघार न घेण्याचा पुनरुच्चार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी तडजोडीसाठी आपल्यावर दबाव टाकला जात असल्याचा दावा केला आहे. आरोप करणाऱ्या सात महिला कुस्तीपटूंपैकी एका अल्पवयीन साक्षीदाराने दबावाखाली आपले विधान बदलल्याचे शनिवारी ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक हिने स्पष्ट केले.
ऑलिम्पियन साक्षी मलिक हिने शनिवारी काही खासगी वृत्तवाहिन्यांशी वार्तालाप करताना अनेक मुद्यांवर प्रकाशझोत टाकला. आमच्यावर तडजोड करण्यासाठी खूप दबाव आहे. तसेच ब्रिजभूषण शरण सिंह यांनी तक्रारकर्त्यांना फोन करून धमकी दिल्याचा आरोपही याप्रसंगी तिने केला. आम्ही आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आरोपींच्या अटकेची आणि कोठडीत घेऊन चौकशी करण्याची मागणी करत असून ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक केल्याशिवाय निष्पक्ष तपास होऊ शकत नाही, असेही पुढे स्पष्ट केले.
केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत 15 जूनपर्यंत वेळ देण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार नाही. 15 जूननंतरच आम्ही भविष्याची रणनीती ठरवू. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीपासून आम्ही मागे हटलेलो नाही, असे कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी सांगितले.