संयुक्त राष्ट्रसंघात भारताने कॅनडाला फटकारले
वृत्तसंस्था/ जीनिव्हा
भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. संयुक्त राष्ट्रसंघात भारताने कॅनडाला चांगलेच फटकारले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेत भारताने कॅनडावर निशाणा साधला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग न करण्याची सूचना भारताने कॅनडाला केली आहे. तर एक दिवस अगोदर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करण्याचा आरोप केला होता. दोन्ही देशांदरम्यान सप्टेंबर महिन्यापासून तणावाची स्थिती आहे. 18 सप्टेंबर रोजी ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येसाठी भारताला जबाबदार ठरविले हेते.
हिंसा भडकविण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग रोखण्यात यावा आणि कट्टरतावादाला बळ देणाऱ्या समुहांच्या कारवाया रोखून देशांतर्गत व्यवस्था मजबूत करण्याचे आवाहन भारताने कॅनडाला केले आहे. याचबरोबर भारताने धार्मिक अल्पसंख्याकांच्या पूजास्थळांवरील हल्ले रोखण्याचे आणि देशातील वाढत्या द्वेषयुक्त गुन्ह्यांना रोखण्याचे आवाहन कॅनडाला केले आहे. कॅनडाने कायदेशीर उपाययोजनांच्या मदतीने द्वेषयुक्त गुन्ह्यांना आळा घालण्याचे प्रयत्न करावेत असे भारताने म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषदेच्या युनिव्हर्सल पीरियोडिक रिव्ह्यू वर्किंग ग्रूपकडून ही बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत कॅनडातील मानवाधिकारांच्या स्थितीची चौथ्यांदा समीक्षा करण्यात आली आहे. यूपीआर वर्किंग ग्रूप संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व सदस्य देशांमधील मानवाधिकार स्थितीची नियमित समीक्षा करत असतो. यात मानवाधिकार परिषदेचे 47 सदस्य देश सामीलआहेत. परंतु जेव्हा कुठल्याही देशाच्या मानवाधिकार स्थितीची समीक्षा केली जाते, तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य देश यात भाग घेऊ शकतो.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारत सामील असल्याच्या आरोपांचा रविवारी पुनरुच्चार केला होता. कॅनडा नेहमी कायद्याच्या राज्यासाठी उभा राहणार आहे. निज्जरच्या हत्यप्रेकरणी कॅनडा रचनात्मक स्वरुपात काम करू इच्छितो. याप्रकरणी तपासासाठी भारताशी संपर्क साधला असल्याचे ट्रुडो यांनी म्हटले होते.