ब्रिक्स शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी दौरा, जिनपिंग यांच्याशी चर्चा होणार का, याविषयी उत्सुकता
वृत्तसंस्था / जोहान्सबर्ग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे भव्य स्वागत करण्यात आले आहे. ते येथे आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी या देशाच्या दौऱ्यावर आले आहेत. या परिषदेच्या निमित्ताने त्यांची चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी चर्चा होणार का, यासंबंधी उत्सुकता आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांना या परिषदेपासून दूर ठेवण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साधारण पाच वाजता जोहान्सबर्ग येथे आगमन झाले. येथील भारतीय वंशाच्या समुदायाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचे भव्य स्वागत केले. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी एका ट्विट संदेशाद्वारे या परिषदेचे महत्व विशद केले.
शाही भोजनाचा कार्यक्रम
मंगळवारी रात्री दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी शाही भोजनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला दक्षिण आफ्रिकेचे अनेक मंत्री, मान्यवर नागरीक आणि भारतीय वंशाच्या अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या. भारतीय शिष्टमंडळातील काही प्रतिनिधींही उपस्थित होते. भारताशी मैत्रंाrला दक्षिण आफ्रिका अत्यंत महत्वपूर्ण मानतो अशा शब्दांमध्ये रामाफोसा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव केला आहे.
महत्वाच्या गाठीभेटी
ब्रिक्सची ही शिखर परिषद 22 ऑगस्टपासून 24 ऑगस्टपर्यंत तीन दिवस चालणार आहे. या परिषदेला जगातील बलाढ्या देशांचे अध्यक्ष आणि प्रमुख उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी यांची त्यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर आणि जागतिक घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग हे या परिषदेसाठी आले असून पंतप्रधान मोदी यांची त्यांच्याशीं चर्चा होणार का, यासंबंधी भारतात आणि जगातही औत्सुक्य आहे. तसा पूर्वनिर्धारित कार्यक्रम नसल्याचे स्पष्टीकरण भारताच्या परराष्ट्र विभागाकडून देण्यात आले असले तरी ऐनवेळी ही भेट होऊ शकते असेही काही तज्ञांचे मत आहे.
पुतीन दूर
या शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन उपस्थित नाहीत. मात्र, त्यांनी आपले प्रतिनिधी म्हणून रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांना पाठविले आहे. युक्रेन युद्धासंदर्भात पुतीन यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे युद्धगुन्ह्यांच्या संदर्भात वॉरंट आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्यांनी ही शिखर परिषद टाळली असावी असे बोलले जात आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना त्यांच्या सल्लागारांनी परिषदेपासून दूर राहण्याची सूचना केली आहे. मात्र, त्यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरली आहे. शिखर परिषदेचे मुख्य कार्यक्रम आज बुधवारपासून होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.