मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक : पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डाही उपस्थित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवीन संसदेचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदी भाजपच्या मुख्यालयात पोहोचले. येथे रविवारी त्यांनी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत यंदा होणाऱ्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबरोबरच 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीची चर्चा झाल्याचे समजते. तसेच याप्रसंगी उपस्थितांनी आपापल्या राज्यांचे ‘रिपोर्ट कार्ड’ही पंतप्रधान आणि पक्षप्रमुखांना सादर केल्याचे सूत्रांनी सांगितले.
संसद भवनाच्या उद्घाटनानंतर झालेल्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाही उपस्थित होते. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, नागालँडचे उपमुख्यमंत्री यानथुंगो पॅटन, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, आसामचे मुख्यमंत्री डॉ हिमंता बिस्वा सरमा आदींनीही हजेरी लावली होती. बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यांमध्ये सुरू असलेल्या विकासकामांचा अहवाल पक्षनेतृत्त्वाला सादर केला. तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. पक्षपातळीवर ही बैठक पार पडल्यामुळे त्यामध्ये झालेल्या चर्चेची किंवा निर्णयांची सविस्तर माहिती जारी करण्यात आलेली नाही. तथापि, पंतप्रधान आणि पक्षाध्यक्षांनी या बैठकीत सर्व उपस्थितांना महत्त्वपूर्ण सूचना केल्याचे समजते.