वृत्तसंस्था/ गुवाहाटी
भारतीय फलंदाज पृथ्वी शॉने रणजी करंडक स्पर्धेच्या इतिहासातील दुसऱया क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या नोंदवताना आसामविरुद्ध 379 धावा फटकावल्या. मुंबईतर्फे तो वैयक्तिक सर्वाधिक धावा नोंदवणारा फलंदाजही बनला आहे. त्याच्या खेळीच्या जोरावर मुंबईने रणजी सामन्यात दुसऱया दिवशी 4 बाद 687 धावांवर पहिला डाव घोषित केला. त्यानंतर दिवसअखेर आसामने 1 बाद 129 धावा जमविल्या होत्या.
येथील अमिनगाव क्रिकेट मैदानावर शॉने धावांची बरसात करीत केवळ 383 चेंडूत 379 धावा फटकावताना 49 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली. याआधी माजी फलंदाज व विद्यमान समालोचक संजय मांजरेकर यांच्या नावावर वैयक्तिक सर्वोच्च धावांचा विक्रम होता. त्यांनी 1990-91 च्या मोसमात हैदराबादविरुद्ध 377 धावांची खेळी केली होती. या रणजी मोसमातील शॉचे हे पहिले शतक असून मागील सात डावांत त्याने 22.85 च्या सरासरीने केवळ 160 धावा जमविल्या होत्या. त्यात 68 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.
स्थानिक क्रिकेटमध्ये वारंवार चांगली कामगिरी करूनही 23 वर्षीय पृथ्वीला राष्ट्रीय संघात निवडण्यात आलेले नाही. जुलै 2021 मध्ये त्याने राष्ट्रीय संघातून शेवटची टी-20 खेळली होती. सय्यद मोदी क्रिकेटमध्येही त्याने 181.42 च्या स्ट्राईकरेटने 332 धावा फटकावल्या. त्याने आसामविरुद्ध 134 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्याने 7 डावांत 217 धावा जमविल्या, मात्र लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 50 हून अधिक आहे.
या सामन्याच्या पहिल्या दिवशी तो 283 चेंडूत 240 धावांवर नाबाद राहत आधीचा सर्वाधिक वैयक्तिक धावा मागे टाकल्या होत्या. त्याने पहिल्या गडय़ासाठी मुनीर खानसमवेत 123 धावांची व अजिंक्य रहाणेसमवेत तिसऱया गडय़ासाठी अभेद्य 200 धावांची भागीदारी केली. त्याने रोशन आलमला विशेष टार्गेट करताना चेंडूस धावा या गतीने 76 धावा चोपल्या.