सुपरस्टार मोहन लाल यांच्यासोबत झळकणार
दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणि अलिकडेच शाहरुख खानसोबत ‘जवान’ या चित्रपटात दिसून आली आहे. या चित्रपटातील अभिनयासाठी प्रियामणिचे कौतुक होत आहे. याचदरम्यान प्रियामणि आता दक्षिणेतील दिग्गज कलाकार मोहन लाल यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे. यासंबंधीची माहिती तिनेच सोशल मीडियावर दिली आहे. ‘जवान’ या चित्रपटात प्रियामणिने लक्ष्मी नावाची भूमिका साकारली आहे. प्रियामणिने सोशल मीडियावर एक छायाचित्र शेअर केले असून यात ती स्वत:चा आगामी चित्रपट ‘नेरू’चा क्लॅपबोर्ड पकडून असल्याचे दिसून येते. नेरू चित्रपटाच्या सेटवर काम सुरू केले आहे. मोहनलाल यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट असल्याचे तिने नमूद केले आहे. प्रियामणि यापूर्वी ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटातील एका गाण्यात दिसून आली होती. याचबरोबर प्रियामणि ही अभिनेता अजय देवगण याच्यासोबत ‘मैदान’ या चित्रपटात काम करत आहे. प्रियामणि ही चित्रपटांच्या निवडीबाबत अत्यंत चोखंदळ असल्याचे मानले जाते. यामुळे ती फारच कमी चित्रपटांमध्ये दिसून आली आहे.