प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आज काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियांका गांधी येणार आहेत. त्यानिमित्त येथील मलप्रभा क्रीडांगणावर जाहीर सभा होणार आहे. सभेची तयारी झाली असून या ठिकाणी भव्य मंडप आणि स्टेज उभारण्यात आले आहे. काँग्रेस कार्यकर्ते प्रचारसभेत मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.
खानापूर तालुका मतदारसंघात काँग्रेसच्या प्रचारासाठी गांधी घराण्यातील व्यक्ती पहिल्यांदाच येत असल्याने कुतूहल निर्माण झाले आहे. खानापूर तालुक्यात काँग्रेस आमदाराच्या रुपातून अंजली निंबाळकर यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. अंजली निंबाळकर यांचा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींशी थेट संपर्क आहे. तसेच निवडणूक प्रचारासाठी प्रियांका गांधी येत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळे कार्यकर्तेही सभेच्या आयोजनासाठी गेल्या दोन दिवसांपासून तयारीत गुंतले आहेत. मलप्रभा क्रीडांगणावर भव्य स्टेज आणि मंडप उभारण्यात आला आहे. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून काँग्रेसचे कार्यकर्ते सभेत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
अंजली निंबाळकर या राहुल गांधी यांच्या पदयात्रेत कर्नाटक, तेलंगणा तसेच महाराष्ट्र राज्यात सहभागी झाल्या होत्या. पदयात्रेवेळी सोनिया गांधींचीही त्यांनी भेट घेतली होती. राहुल गांधी यांनीही निंबाळकर यांचे पदयात्रेतील सहभागाबद्दल कौतुक केले होते. अंजली निंबाळकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय स्तरावरील तसेच महाराष्ट्रातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रचारासाठी खानापुरात येणार आहेत. निंबाळकर यांना आपल्या विजयाची खात्री असून आपण केलेल्या विकासकामांच्या आधारावर मतदार निश्चित पाठीशी राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते तालुक्याच्या कानाकोपऱ्यात प्रचारासाठी कष्ट घेत आहेत.