भारत समर्थक सोलिह अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत
वृत्तसंस्था/ माले
मालदीवमध्ये मोहम्मद मुइज्जू हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. मुइज्जू हे विरोधी पक्षांच्या प्रोग्रेसिव्ह अलायन्सचे नेते आहेत. मोहम्मद मुइज्जू यांनी निवडणुकीत इब्राहिम सोलिह यांना 18 हजार मतांनी पराभूत केले आहे. मुइज्जू यांना या निवडणुकीत 53 टक्के मते मिळाली तर सोलिह यांना 46 टक्के प्राप्त झाली आहेत.
माजी अध्यक्ष सोलिह यांनी मुइज्जू यांचे सोशल मीडियावरून अभिनंदन केले आहे. तसेच शांततापूर्ण निवडणुकीसाठी लोकांचे आभार मानले आहेत. निवडणुकीच्या या निकालावर मालदीवच्या जनतेचीच नव्हे तर भारत अन् चीनचीही नजर होती. अध्यक्षपदाच्या शर्यतीत सामील दोन्ही मोठ्या नेत्यांपैकी इब्राहिम सोलिह हे भारत समर्थक मानले जातात. तर मुइज्जू हे चीनसमर्थक म्हणून ओळखले जातात.
मालदीवमध्ये अध्यक्षपदाकरता दुसऱ्या टप्प्यातील मतदान घ्यावे लागले आहे. यापूर्वी 8 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले होते. परंतु तेव्हा कुणालाच बहुमत मिळाले नव्हते. मालदीवमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी 50 टक्के मतांची गरज असते.
चीनचा प्रभाव वाढणार
मुइज्जू यांच्या विजयामुळे भारताच्या शेजारी देशात चीनचा प्रभाव पुन्हा वाढणार आहे. मुइज्जू यांचा पक्ष पीपल्स नॅशनल काँग्रेसच्या मागील कार्यकाळात मालदीव हा चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमध्ये सामील झाला होता. अध्यक्षपदाची निवडणूक जिंकणारे मुइज्जू हे मालदीवची राजधानी मालेचे महापौर आहेत. या पदावर राहून त्यांनी स्वत:चे चीनसोबतचे संबंध मजबूत केले आहेत. अलिकडेच माले शहराच्या विकासावरून चीनसोबत 16 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प त्यांनी सुरु केला आहे. याच्या अंतर्गत मालेला एका ब्रिजद्वारे शहराच्या विमानतळासोबत जोडले जाणार आहे. या ब्रिजला फ्रेंडशिप ब्रिज देखील म्हटले जातेय.
मुइज्जू यांची राजकीय झेप
मुइज्जू हे पेशाने सिव्हिल इंजिनियर असून त्यांचे शिक्षण ब्रिटनमध्ये झाले आहे. 2018 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मालदीवचे तत्कालीन अध्यक्ष अब्दुल्लाह यामीन यांना सत्ता सोडावी लागली होती, तेव्हा मुइज्जू हे देशाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. यामीन हे तुरुंगात गेल्याने मुइज्जू यांना पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. परंतु त्यांनी पक्षाचे विदेश विषयक धोरण बदलले नाही. ते देखील यामीन यांच्याप्रमाणेच चीनचे समर्थक आहेत. मुइज्जू यांनी निवडणूक प्रचारात इंडिया आउट कॅम्पेनची मदत घेतली होती. निवडणुकीत विजयी झाल्यास यामीन यांची तुरुंगातून मुक्तता करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. यामीन हे सध्या भ्रष्टाचाराप्रकरणी 11 वर्षांच्या शिक्षेला सामोरे जात आहेत.
मालदीवचे भौगोलिक महत्त्व
हिंदी महासागरातील मालदीवच्या भौगोलिक स्थानामुळे चीन अन् भारत दोघांसाठीही या देशाचे सामरिक महत्त्व आहे. मालदीव 1100 हून अधिक छोट्या मोठ्या बेटांचा समुह असून ती हिंदी महासागरात दक्षिण-पश्चिमेपर्यंत फैलावलेले आहेत. तसेच पूर्व देशांना पाश्चिमात्य देशांशी जोडणारा हा एक महत्त्वाचा मार्ग देखील आहे. यातील 16 बेटांना चीनने भाडेतत्वावर मिळविले आहे. चीनने या बेटांवर कब्जा केल्यास भारताच्या व्यापारी जहाजांसोबत नौदलाच्या ताफ्यावरही तो सहजपणे नजर ठेवू शकतो. तसेच युद्धाच्या स्थितीत या बेटांवर स्वत:च्या युद्धनौका तैनात करू शकतो.