कारवार-अंकोलाचे नूतन आमदार सतीश सैल यांचे आश्वासन
प्रतिनिधी / कारवार
सिव्हिल ठेकेदारांच्या समस्यांची आपणालाच जाणीव आहे. ठेकेदारांच्या समस्या दूर करण्यासाठी लवकरच प्रामाणिक प्रयत्न करण्यात येतील, असे ठोस आश्वासन कारवार-अंकोलाचे नूतन आमदार सतीश सैल यांनी दिले. कारवार तालुका सिव्हिल ठेकेदार संघटनेच्यावतीने येथील अजवी हॉटेलमध्ये त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी बोलताना सैल पुढे म्हणाले, कारवार-अंकोला मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रीतपणे कार्य करण्याची गरज आहे. ठेकेदारांनी केलेल्या विविध कामांचे बिल देण्यात आलेले नाही. त्याकरिता लवकरच ठेकेदारांच्या प्रतिनिधीची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी भेट घडवून आणण्यात येईल. अलीकडेच राज्य सरकारने बिल पावती संदर्भात जारी केलेल्या आदेशामुळे ठेकेदार अडचणीत आले आहेत. सरकारने हा आदेश पूर्ण झालेल्या आणि सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी तात्पुरता जारी केला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारवार तालुका नोंदणीकृत सिव्हिल ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष माधव नाईक होते. ते म्हणाले, ठेकेदार विविध आर्थिक संस्थांकडून कर्ज घेऊन ठेकेदारीचा व्यवसाय करीत असतात. गेल्या पाच वर्षांत ठेकेदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. सैल यांची आमदारपदी निवड झाल्याने आमच्या समस्या निश्चितपणे दूर होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ठेकेदार संतोष सैल, दीपक कुडाळकर, धीरू शानबाग, संदीप कोठारकर, अनिल मालसेकर, रवी नाईक, मुरुकुंडी नाईक, उपेंद्र आदीसह अनेक ठेकेदार उपस्थित होते.