प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव-पुणे जनशताब्दी एक्स्प्रेस सुरू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मध्य रेल्वे व नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा सुरू होती. परंतु, अद्याप ही एक्स्प्रेस सुरू होण्यासाठी मुहूर्त मिळालेला नाही. पुणे येथील जनशताब्दीची घोषणा होऊन तीन ते चार वर्षे उलटली. परंतु, अद्यापही एक्स्प्रेस सुरू झालेली नाही. त्यानंतर बेळगाव-मनगुरू या मार्गावर एक्स्प्रेस सुरू झाली. इतर मार्गांवर एक्स्प्रेस सुरू होत असताना बेळगाव-पुणे रेल्वेमार्गाबाबतच चालढकल का? असा प्रश्न प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांच्या संकल्पनेतून बेळगाव-पुणे जनशताब्दी एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु, कोरोनादरम्यान सुरेश अंगडी यांचे निधन झाल्याने या एक्स्प्रेसला खो बसला. त्यानंतरच्या काळात मिरज-बेळगाव रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण काम हाती घेण्यात आले. तसेच बेळगाव रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करण्यात येत असल्याने या रेल्वेला विलंब झाला.
सध्या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण अंतिम टप्प्यात असून बेळगाव-पुणे मार्गावर जनशताब्दी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. मध्यंतरी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने जनशताब्दीसाठी तयारी सुरू केली होती. रेल्वे अधिकाऱ्यांनी यासंदर्भात पाहणी करत लवकरच एक्स्प्रेस सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने ही रेल्वे सुरू होण्यास विलंब होत आहे. बेळगावमधील अनेकजण पुणे येथे नोकरी-व्यवसायानिमित्त असल्यामुळे त्यांना ये-जा करण्यासाठी जनशताब्दी एक्स्प्रेस महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे जनशताब्दी लवकर सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
पुण्यासाठी रात्रीची रेल्वे गरजेची
सध्या बेळगावहून रात्रीच्यावेळी पुण्याला जाण्यासाठी हुबळी एक्स्प्रेस व त्यानंतर धावणारी गोवा एक्स्प्रेस उपलब्ध आहे. परंतु, रात्री साडेसातनंतर पुण्याला जाण्यासाठी एक्स्प्रेस नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. हुबळी व गोवा एक्स्प्रेस मध्यरात्री तीनच्या सुमारास पुण्याला पोहोचते. त्यामुळे प्रवाशांना तितकासा उपयोग होत नाही. या कारणास्तव रात्री 11 च्या सुमारास बेळगावमधून निघून सकाळी 6 वाजता पुणे येथे पोहोचेल, अशा पद्धतीने जनशताब्दी एक्स्प्रेसचे वेळापत्रक ठरविण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.