मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे पणजीत प्रतिपादन : क्रिएटर्स कनेक्ट’चा उद्घाटन सोहळा उत्साहात
पणजी : प्रत्येक विद्यार्थ्याने कला आणि संगीतातील त्यांच्या आवडीचे पालन केले पाहिजे. योग्य प्रयत्न केल्यास त्यांच्या छंदांचे व्यवसायात रूपांतर होऊ शकते. क्रिएटर्स कनेक्टद्वारे पटकथा लेखन आणि गायन या क्षेत्रात गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक दरवाजे उघडता येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. राज्यातील उच्च शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता ओळखण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पणजी येथील मनोरंजन सोसायटीत आयोजित केलेल्या क्रिएटर्स कनेक्टच्या उद्घाटन समारंभात ते ऑनलाईन माध्यमाद्वारे बोलत होते. उच्च शिक्षण संचालनालय आणि गोवा राज्य उच्च शिक्षण परिषद यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भारतीय पार्श्वगायिका रागिणी कवठेकर, पटकथा लेखक प्रशांत पांडे, अल्बम संगीतकार डोनी हजारिका आणि भारतीय दूरचित्रवाणी व वेब मालिका लेखक सुमृत शाही उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.
राज्यातील विद्यार्थ्यांना कलात्मक प्रशिक्षण
क्रिएटर्स कनेक्टद्वारे गोव्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी संगीत, नृत्य, पटकथालेखन आणि कथाकथन यामध्ये त्यांना प्रशिक्षित करणे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देणे हा या आयोजनामागचा उद्देश आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन उच्च शिक्षण संचालनालयाचे अतिरिक्त संचालक प्रा. जर्वासिओ एस. एफ. एल मेंडिस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाची सुऊवात मुगाफी (अनलू) फेलोशिप शोरीलच्या स्क्रीनिंगने झाली. गोवा राज्य उच्च शिक्षण परिषदेचे प्रो. नियॉन मार्शेन, मुगाफीचे सीईओ विपूल अग्रवाल आणि डॉ. तन्वी बांबोळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
क्रिएटर्स कनेक्ट’ – राज्य सरकारचा पहिलाच उपक्रम
मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, गोवा राज्य उच्च शिक्षण परिषद, उच्च शिक्षण संचालनालय गोवा सरकार आणि मुगाफी यांच्यातील सामंजस्य कराराचा भाग म्हणजे क्रिएटर्स कनेक्ट हा कार्यक्रम होय. शासनाचा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. गोव्यातील तऊण, महत्त्वाकांक्षी लेखक आणि संगीतकारांना त्यांच्या सर्जनशीलतेचे प्रदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम प्रोत्साहन देईल.
राज्यातील 40 संस्थांमधील 350 विद्यार्थ्यांचा सहभाग
राज्यातील 40 उच्च शैक्षणिक संस्थांमधील एकूण 350 विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी गोव्याच्या विद्यार्थ्यांनी संगीत, नृत्य, नाटक आणि कथाकथन यातील त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन केले. हे विद्यार्थी आता बूटपॅम्प, ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रशिक्षण आणि हँड-ऑन अॅक्टिव्हिटीजच्या रूपात सखोल प्रशिक्षणांना उपस्थित राहतील.