सेन्सेक्समध्ये 288 अंकांची घटः आशियातील बाजारही घसरणीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात मागील सात दिवसांच्या कामगिरीमध्ये तेजीचा प्रवास कायम सुरु होता. मात्र नफा कमाईच्या दबावात मंगळवारी बाजार घसरणीसह बंद झाला आहे. आशियातील बाजारात घसरणीचा कल राहिल्याचाही परिणाम झाल्याचे दिसून आले.
जागतिक पातळीवरील एकूण घडामोडींचा अंदाज घेतल्यास यामध्ये आशिया व विदेशी संस्थांकडून करण्यात आलेल्या विक्रीच्या दरम्यान गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणात नफा वसूली केल्याने ही स्थिती निर्माण झाली असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. यामध्ये दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स 287.70 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 59,543.96 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 74.40 अंकांनी घसरण होत तो 17,656.35 बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये नेस्ले इंडियाचे समभाग सर्वाधिक म्हणजे 2.83 टक्क्यांनी घसरले आहेत. तसेच नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व्ह, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये टेक महिंद्रा, मारुती सुझुकी, लार्सन ऍण्ड टुब्रो, डॉ.रेड्डीज लॅब, भारतीय स्टेट बँक, एनटीपीसी आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्रा यांचे समभाग मजबूत होत बंद झाले आहेत.
दररोज वापरात असणारी उत्पादने बनविणाऱया कंपन्या आणि खासगी बँका यांच्या समभागात शेअर बाजारात घसरण झाली आहे. यामध्ये प्रारंभीचा लाभ गमावत बाजार बंद झाला आहे. युरोपीय केंद्रीय बँकांकडून आपल्या आगामी पतधोरण बैठकीत व्याज दरात वृद्धी करण्याच्या अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता असल्याने मोठय़ा प्रमाणात नफा वसुली झाल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. दक्षिण कोरियाचा कॉस्पी, चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे घसरणीत बंद झाले.