चंदीगड, अमृतसरमध्ये एनआयएची मोठी कारवाई
वृत्तसंस्था/ अमृतसर
खलिस्तान समर्थक आणि बंदी घातलेल्या शीख फॉर जस्टिस या संघटनेचा कार्यकर्ता गुरपतवंतसिंग पन्नू याच्यावर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी मोठी कारवाई केली. एनआयएने चंदीगड आणि अमृतसरमधील त्याची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईमुळे जप्त केलेल्या मालमत्तेवरील मालकी हक्क पन्नूने गमावला असून आता या मालमत्ता सरकारी झाल्या आहेत.
पन्नू हा अमृतसरचा रहिवासी असून एनआयएने त्याच्यावर बक्षीसही जाहीर केले आहे. पॅनडामध्ये राहूनही पन्नू भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पन्नूवर भारतामध्ये देशविरोधी कटासह एकूण 7 गुन्हे दाखल असून त्याचा तपशील देण्यात आला आहे. पन्नूच्या गुह्यांची माहिती अनेकवेळा दिल्यानंतरही पॅनडाने या दहशतवाद्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.
एनआयएने खलिस्तानवादी गुरपतवंत पन्नूचे चंदीगडस्थित सेक्टर 15 मधील घर जप्त केले आहे. शनिवारी सकाळच्या सत्रात एनआयएचे पथक सुमारे अर्धा तास येथे उपस्थित होते. यादरम्यान त्यांनी घराबाहेर सूचना फलक लावला. त्याचप्रमाणे अमृतसरच्या खानकोट गावात पन्नूची 46 कनाल शेतजमीन जप्त करण्यात आली. याआधी 2020 मध्ये गुरपतवंत सिंग पन्नू याला फरार घोषित करून त्याची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.