मूलभूत सुविधा पुरविण्याची मागणी
बेळगाव : पिण्याचे पाणी, रस्ते, गटार आदी मूलभूत सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी देवराज अर्स कॉलनीतील नागरिकांनी रविवारी आंदोलन केले. जर पुढील पंधरा दिवसात सुविधा पुरविण्यासंबंधी मनपाने ठोस भूमिका घेतली नाही तर महामार्ग रोखण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. देवराज अर्स कॉलनी वसविल्यानंतर मूलभूत सुविधा पुरविण्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाला त्याचा विसर पडला आहे. तब्बल 15 ते 20 दिवसातून एकदा पिण्याचे पाणी पुरविले जाते. रस्त्यांची चाळण झाली आहे. बस सुविधा नियमित नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. खासकरून विद्यार्थी व नोकरदारांची अपुऱ्या बससुविधेमुळे गैरसोय होते. गटारी व्यवस्थित नाहीत. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही. प्रशासनाने त्वरित मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.