वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनमध्ये निदर्शकांच्या विरोधात झालेल्या हिंसक निदर्शनानंतर पोलिसांनी 15 जणांना अटक केली आहे. या हिंसक निदर्शनात एक पोलीस कर्मचारी आणि 2 जण जखमी झाले होते. लिव्हरपूलपासून 13 किलोमीटर अंतरावरील एका गावात ही निदर्शने झाली आहेत. एका स्थलांतरिताने स्थानिक मुलीची छेड काढल्याचा आरोप होता, या घटनेमुळे स्थानिक लोक संतापले होते. तर घटनेनंतर 20 वर्षीय युवकाला अटक करण्यात आली होती, परंतु चाइल्ड प्रोटेक्शन सर्व्हिसच्या सुचनेनुसार त्याची सुटका करण्यात आली होती.
छेडछाडीचा आरोपी ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होता, तेथे धाव घेत स्थानिक लोकांनी हिंसेस सुरुवात केली. हे लोक हातात हातोडा आणि स्फोटक सामग्री घेऊन पोहोचले हेते. जमाव प्रक्षुब्ध असल्याने मोठय़ा प्रमाणात हिंसा होण्याची भीती निर्माण झाली होती.
नॉस्लेचे खासदार जॉर्ज होवार्थ यांनी स्थलांतरितांवरील हल्ल्याची निंदा केली. या भागातील पूर्ण समुदाय स्थलांतरितांसंबंधीच्या निदर्शकांच्या विचारांशी सहमत नाही. सर्व लोक कट्टर नाहीत. आम्ही जगातील धोकादायक भागांमधून वाचून आलेल्या लोकांचे स्वागत करतो असे खासदार होवार्थ यांनी म्हटले आहे.
ब्रिटन पूर्ण युरोपमध्ये सर्वात कमी संख्येत शरणार्थींना आसरा देतो, परंतु अलिकडच्या काळात इंग्लिश खाडी ओलांडून छोटय़ाछोटय़ा नौकांमधून मोठय़ा प्रमाणात विदेशी लोक इंग्लंडमध्ये पोहोचत आहेत. 2022 मध्ये जवळपास 45 हजार विदेशी लोक ब्रिटनमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे आश्रय मागणाऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. या लोकांना राहण्याची जागा न मिळाल्यास ते हॉटेल्समध्ये राहू लागतात.
भारतीय नागरिक देखील छोटय़ा नौकेतून इंग्लिश खाडी ओलांडून अवैधमागांने ब्रिटनमध्ये दाखल होत आहेत. मागील वर्षी 233 हून अधिक भारतीयांनी अवैधमार्गाने ब्रिटनमध्ये प्रवेश मिळविला आहे. तर 2023 मध्ये एका महिन्यातच हा आकडा 250 हून अधिक ठरला आहे.