वार्ताहर /हरमल
ज्ञानदीप प्रतिष्ठान आयोजित गोवा केंद्रीय वाचनालयाचे क्युरेटर डॉ. सुशांत तांडेल यांच्या ‘अविस्मरणीय देशाटन’ या पुस्तकांचे प्रकाशन जीवन मुक्त मठाचे महाराज मुकुंद महाराह यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत शिवोली येथे करण्यात आले. शिवोली जीवनमुक्त महाराजांच्या आश्रमात सदर सोहळा झाला. या सोहळ्यास जेष्ट्या पत्रकार अवित बगळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष भारत बेतकेकर, तीर्थाटन विभागाच्या प्रमुख राखी पालेकर, विनय चोपडेकर व प्रा. विनय माडगांवकर उपस्थित होते. तीर्थाटन केल्याने आपणास त्या त्या राज्याची भाषा, जेवण राहणीमानाची जवळून पाहण्याची संधी मिळते. त्यांची संस्कृती जाणून घेण्याची कला अवगत होते व त्याचे वर्णन शब्दरूपात करण्याचे कसब लेखक डॉ तांडेल यांनी केले. त्यांच्या हातून अनेकविध पुस्तके प्रकाशित होवो, अशा शुभेच्छा महाराज मुकुंदराज माडगांवकर यांनी दिल्या.
देवदर्शन व देशाटन करून अनेक अविस्मरणीय अनुभव घेतले व त्या अनुभवाचा वापर करून पुस्तक लिहिले, असे पुस्तकांचे लेखक डॉ. तांडेल यांनी सांगितले. लेखकांबरोबर देशाटन करण्याचा योग आला. त्यांनी प्रवासादरम्यान आलेले अनुभव सोप्या व साध्या भाषेत मांडले. त्यांच्या लेखनात नजरेसमोर शब्दचित्रे उभे करण्याची ताकद असल्याचे जेष्टय पत्रकार अवित बगळे यांनी व्यक्त केले. यावेळी विनय माडगांवकर, सुजय गोकर्णकर, लक्ष्मीकांत परब, गजानन भाटकर, उषा परब यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माया भाटकर, स्वागत राखी पालेकर, प्रास्ताविक ज्ञानदीपचे भारत बेतकेकर तर विनय चोपडेकर यांनी आभार मानले.