धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन : फळे-फुलांची खरेदी : बाजारात महिलांची लगबग
प्रतिनिधी / बेळगाव
श्रावणामुळे बाजारात फळे-फुले आणि उपवासाच्या पदार्थांच्या मागणीत वाढ झाली आहे. श्रावणात पूजा-अर्चा आणि धार्मिक कार्यक्रम वाढले आहेत. परिणामी बाजारपेठेत फळे-फुले आणि पूजेच्या साहित्याचा बहर आला आहे.
श्रावण हा व्रत-वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. विविध ठिकाणी व मंदिरांतून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे बाजारात फळे, फुले, हार, पाने यासह पूजेच्या साहित्याची मागणी वाढली आहे. त्याबरोबरच दर सोमवारी आणि शुक्रवारी महिलावर्गाकडून उपवास केले जात आहेत. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढली आहे. त्यामध्ये वरी तांदूळ, साबू, राजगिरा लाडू यासह फळांना पसंती दिली जात आहे. श्रावणामुळे बाजारात फळ-फुलांबरोबर उपवासाच्या साहित्याची खरेदी होऊ लागली आहे.
श्रावणमासाच्या पार्श्वभूमीवर दर सोमवारी शिव मंदिरांतून दर्शनासाठी गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे फळे-फुलांबरोबर हार, नारळ, केळी, पाने, अंबोत्या यासह इतर पूजेच्या साहित्याची खरेदी होऊ लागली आहे. बाजारात वरी, साबू यासह फळांना मागणी वाढत आहे. सफरचंद, पेरू, डाळींब, सीताफळ, संत्री, पपई, अननस, केळी, चिकू आदी फळांची विक्री वाढली आहे.
17 ऑगस्टपासून निज़श्रावण मासाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे महिनाभर धार्मिक कार्यक्रमांमुळे पूजेचे साहित्य आणि उपवासाच्या पदार्थांची मागणी कायम आहे. त्यामुळे गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, मेणसी गल्ली, मारुती गल्ली, कडोलकर गल्ली, भातकांडे गल्ली, नरगुंदकर भावे चौक आदी ठिकाणी नागरिकांची वर्दळ वाढत आहे.