अंगणातील दुचाकीने अचानक पेट घेतल्यामुळे घटना
ओटवणे प्रतिनिधी
अंगणातील दुचाकीने अचानक पेट घेतल्यामुळे पल्सर टू ट्वेंटी दुचाकी आगीत भस्मसात झाल्याची घटना शुक्रवारी सकाळीच ओटवणे मांडवफातरवाडीत घडली. या घटनेत सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले.
इन्सुली येथील दत्ताराम रामा गावडे यांनी आपली पल्सर टू ट्वेंटी (MH 05 CN 6424) ही दुचाकी काल गुरूवारी रात्री आपले ओटवणे येथील सासरे साबाजी बिले यांच्या अंगणात उभी करून ठेवली होती. शुक्रवारी सकाळी ७:३० च्या सुमारास या दुचाकीने अचानक पेट घेतला. यावेळी बिले कुटुंबीयांसह शेजाऱ्यांनी पाण्याने ही आग विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र तोपर्यंत या दुचाकीतील पेट्रोलच्या टाकीचे झाकण फुटून आतील पेट्रोलनेही पेट घेतल्यामुळे पूर्ण दुचाकी या आगीत भस्मसात झाली.
या आगीच्या प्रचंड ज्वाळामुळे घराच्या विज मीटरचे झाकण जळाले तसेच अंगणात वाळत ठेवलेले कपडेही जळाले. बिले कुटुंबीयांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारीही घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. या घटनेत पल्सर टू ट्वेंटी मोटरसायकल जळून भस्मसात झाली.